केंद्र सरकारने पोस्ट विभागातल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्पादकता आधारित बोनसला (PLB) मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या सॅलरीइतका बोनस मिळणार आहे. पण प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी प्रत्यक्ष रक्कम त्याचे पात्र वेतन, सेवा कालावधी आणि लागू नियमांनुसार ठरणार आहे.
पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसचं गणित करण्यासाठी मासिक पात्र वेतनाची मर्यादा ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. बोनसचं गणित करताना पुढील सूत्र वापरले जाणार आहे.
बोनस = (सरासरी मासिक पात्र वेतन × ६०) ÷ ३०.४
या सूत्रानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचं सरासरी मासिक पात्र वेतन ७ हजार रुपये असल्यावर त्याला अंदाजे १३,८१६ रुपये बोनस मिळू शकतो. पण ही कमाल वेतन मर्यादेवर आधारित अंदाजित रक्कम आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एवढाच बोनस मिळेल, असं नाही.
पोस्टाच्या या बोनस योजनेत मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), गट क आणि पात्र अराजपत्रित गट ब कर्मचारी यामध्ये येतात. तसेच नियमित ग्रामीण डाक सेवकांना (GDS) एक्स-ग्रेशिया बोनस, तर निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या कंत्राटी स्वरूपातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना अॅड-हॉक बोनस मिळू शकतो.
पात्र कॅज्युअल कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत सलग किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, वर्षाला २४० दिवस काम केलेलं असावं. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा असलेल्या कार्यालयांसाठी ही मर्यादा २०६ दिवस आहे. या कर्मचाऱ्यांच्या गणनेसाठी १,२०० रुपयांची निर्धारित मासिक मजुरी विचारात घेतली जाईल.
डाक विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बोनससंदर्भात आदेश जारी केला आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार पैसे जमा होण्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. ग्रामीण डाक सेवकांचा बोनस त्यांच्या टीआरसीए (TRCA) आणि संबंधित महागाई भत्त्याच्या आधारे ठरणार आहे. त्यामुळे अंतिम रक्कम आणि पैसे जमा होण्याच्या तारखेसाठी कर्मचाऱ्यांना विभागाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.