मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता उशिराने मिळाल्याने राज्यातील सुमारे २.५ कोटी महिला लाभार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यातच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बाब सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी महायुतीला मोठा पाठिंबा दिला होता. यामुळेच महायुती सरकार पुन्हा विराजमान झाले. त्यामुळे लाडकी बहिन योजनेतील विलंबामुळे महिला मतपेढी नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही लभार्थीनी सांगितले की आठवडेभर बँक खाते तपासत होते. अखेर नोव्हेंबरचे पैसे आले, पण डिसेंबरबाबत काहीच माहिती नाही.
सोलापूरमधील एका लाभार्थीने दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पेमेंट नियमित राहील असे सांगण्यात आले होते. मात्र नोव्हेंबरचाही हप्ता खूप उशिरा मिळाला, असे ती म्हणाली. लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत आणि नियमित यावा अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांत २,८६९ जागा पणाला लागल्या असून, या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे, नाशिक, ठाणे, सोलापूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यांत लाडकी बहिन योजनेच्या नोंदणीमुळे महिलांच्या मतदानात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने मागील विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता पेमेंटमधील विलंबामुळे स्थानिक पातळीवर असंतोष वाढत असल्याचे सत्ताधारी नेतेही मान्य करत आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नोव्हेंबरचा हप्ता जरी जारी झाला असला तरी डिसेंबरचा हप्ता वित्त विभागाच्या मंजुरीवर अवलंबून आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकारवर निधीअभावी हप्ता रखडल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळेच हप्ते उशिरा मिळत आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
महिला लाभार्थी थेट प्रश्न विचारत असल्याने प्रचारात अडचणी येत असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी मान्य केले असून, लाडकी बहिन योजनेचा हप्ता वेळेवर मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.