तलाठ्याने सातबारा नावावर न केल्याने अपंग शेतकऱ्याची आत्महत्या

भाजप खासदार संजय धोत्रेंच्या गावातील दुर्देवी घटना.
तलाठ्याने सातबारा नावावर न केल्याने अपंग शेतकऱ्याची आत्महत्या
तलाठ्याने सातबारा नावावर न केल्याने अपंग शेतकऱ्याची आत्महत्याSaam TV

अकोला- अकोला तालुक्यातील एका अपंग शेतकऱ्याने तलाठ्याने सातबारा नावावर न केल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. असा आरोप या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत तलाठ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत भावाचा मृतदेह घेवून जाणार नाही, अशी भूमिका मृतकांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. ही घटना माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या गावातील आहे, हे विशेष. राम बाबूलाल वानखडे यांच्या नावावर बाबांची 5 एकर 21 आर ही शेती आली होती. राम वानखडे हे अपंग आहेत. ही शेती स्वतःच्या नावावर व्हावी, म्हणून राम वानखडे यांनी तलाठी, त्यानंतर जिल्हाधिकारी, एसडीओ, मंडळ अधिकारी यांच्याकडे चकरा मारल्या.

त्यांनी सर्वांनी अपंग राम वानखडे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर अपंग राम वानखडे यांनी परत तलाठी इंगळे यांच्याकडे शेत आपल्या नावावर करून देण्यासाठी चकरा मारल्या. परंतु, तलाठी इंगळे यांनी राम वानखडे यांच्या नावावर सातबारा केला नाही. परिणामी, राम वानखडे यांनी घरातील शेतीसाठी असलेले कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे भाऊ शरद वानखडे आणि रणजित वानखडे व इतर नातेवाईकांनी राम वानखडे यांच्या मृत्यूला तलाठी इंगळे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत तलाठी इंगळे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत भावाचा मृतदेह येथून नेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या गावातील आहे. त्यामुळे, या गावातीलच शासकीय कर्मचारी येथील नागरिकांना योग्य न्याय देऊ शकत नसल्याने हे भाजपचे आमदार सामान्य नागरिकांना कसा न्याय देतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com