चांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय! वाचा ही सविस्तर माहिती

चांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय! वाचा ही सविस्तर माहिती

कोरोनासंदर्भात एक चांगली बातमी आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होताना पाहायला मिळतीय. 

कोरोनाचं संकट कधी टळणार हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आम्ही एकमेकांना विचारतोय. त्याचं उत्तर आता मिळताना दिसतंय. गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांचा आलेख कमालीचा खाली घसरलाय. नव्या रूग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण यात कमालीची तफावत पाहायला मिळतीय. 

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,469 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 जुलै रोजी कोरोनाचे 34,884 रुग्ण आढळले होते. 

जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत रूग्णवाढीचा वेग कमालीचा होता. दररोज रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. 17 सप्टेंबरपर्यंत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळतंय. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी झालीय.

सध्याच्या घडीला देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,19,502 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तब्बल 72 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.

मात्र कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आलीय. तब्बल 4 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळालीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रूग्ण घटण्याचं प्रमाण अशाच पद्धतीने राहिलं तर नव्या वर्षाच्या सुरूवातीला भारत कोरोनामुक्त झालेला असेल. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या लढ्यात प्रत्येक भारतीयानं योगदान द्यायला हवं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर या नियमांचं पालन काटेकोरपणे व्हायलाच हवं. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com