ढिंग टांग : अजेंडा! (एका हाडाच्या कार्यकर्त्याचा..!)

ढिंग टांग : अजेंडा! (एका हाडाच्या कार्यकर्त्याचा..!)

आम्ही शतप्रतिशत कमळ पार्टीचे प्रामाणिक व मेहनती कार्यकर्ते आहोत, हे एव्हाना साऱ्यांना ठाऊकच असेल. गेल्या इलेक्‍शनी आमची सहायक पन्नाप्रमुखाच्या पदावर सन्मानाने नियुक्‍ती करण्यात आली होती, हेदेखील अनेकांना ठाऊक असेल. मतदार यादीचे पन्ने मोदीकुर्त्याच्या खिश्‍यात ठेवून आम्ही अनेकांना भेटलो होतो, हेही अनेकांच्या स्मरणात असेल. कर्मधर्मसंयोगाने आमची ही मेहनत फुकट गेली. मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकिर!! परंतु, आमचा धीर खचलेला नाही. आम्ही आमचा अजेंडा फिक्‍स केला आहे.

आम्ही शतप्रतिशत कमळ पार्टीचे प्रामाणिक व मेहनती कार्यकर्ते आहोत, हे एव्हाना साऱ्यांना ठाऊकच असेल. गेल्या इलेक्‍शनी आमची सहायक पन्नाप्रमुखाच्या पदावर सन्मानाने नियुक्‍ती करण्यात आली होती, हेदेखील अनेकांना ठाऊक असेल. मतदार यादीचे पन्ने मोदीकुर्त्याच्या खिश्‍यात ठेवून आम्ही अनेकांना भेटलो होतो, हेही अनेकांच्या स्मरणात असेल. कर्मधर्मसंयोगाने आमची ही मेहनत फुकट गेली. मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकिर!! परंतु, आमचा धीर खचलेला नाही. आम्ही आमचा अजेंडा फिक्‍स केला आहे.

‘सत्तेत असलेले तीनचाकी खिचडी सरकार आपल्या वजनानेच पडेल, आपण त्यासाठी काहीही करायचे नाही’ असे आमच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठरले. यापुढे आपण संघर्ष करावयाचा असून, प्रसंगी रस्त्यावर उतरायचे आहे, असा निर्धारदेखील मेळाव्यात जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे कमळ पक्षाच्या आम्हा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश भरला आहे. इतका की त्या दिवशी बाहेर पडून मी चांगले तीन ग्लास उसाचा रस प्यायलो!!

यापुढे संघर्षासाठी शरीर कमावले पाहिजे, असेही मनात आल्याने पक्षकार्य म्हणून जिम जॉइन करण्याचा बेत मनात शिजतो आहे. ‘ऑपरेशन लोटस’ सुरू करावे, अशी एक कल्पना पुढे आली होती. पण, ते लोटस लोटस करीपर्यंत मतदारच आपल्याला दूर लोटसतील, अशी भीती व्यक्‍त करण्यात आली. सबब, नो ऑपरेशन लोटस!

गेले दोन-अडीच महिने वाईट गेले. आमच्या वाट्याची गुळपापडीची वडी दुसऱ्या कुणी पळवली. वास्तविक, त्या गुळपापडीवर आमचा अधिकार होता. पण, तिघांनी एकत्र येऊन ती अल्लद पळविली. आम्ही बसलो हरी हरी करत! हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेतला, तर वाईट वाटणारच ना? प्रश्‍न भुकेचा नव्हता, आपली गुळपापडी दुसऱ्याने कपटाने पळवल्यानंतर फसगतीची भावना येत्ये, ती अधिक वेदनादायक असत्ये. जाऊ दे. झाले गेले गंगेला मिळाले.

सत्ता गेली म्हणून रडत बसण्याची वेळ निघून गेली. माणसाने चार दिवस रडावे, पाचव्या दिवशी कामाला लागावे, हे व्यावहारिक शहाणपण आहे. आमचे (एकमेव) नेते मा. नानासाहेब फडणवीस यांनी ‘‘सत्ता येईल, अशी स्वप्ने बघू नका, रस्त्यावर उतरा’’ असा सल्लावजा आदेश किंवा आदेशवजा सल्ला दिला आहे. तो आम्ही शिरसावंद्य मानू! त्यांनीच आधी ‘मी पुन्हा येईन’ हा अजेंडा ठरवून दिला होता. त्यानुसार आम्ही सगळ्यांना ‘‘आम्ही पुन्हा येणार’’ असेच सांगत होतो. पण, आता आमचा अजेंडा बदलला आहे. यापुढे आम्ही आक्रमक होण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षात बसणे इतके काही कठीण नाही, ते आपल्या डीएनएमध्येच आहे, असे मा. नानासाहेब फडणवीस म्हणाले. मा. चंदुदादादेखील तेच म्हणाले. हे थोर नेते डीएनए- बीएनएची भाषा करायला लागल्याने आम्ही बदललो. एकतर हे डीएनए प्रकरण काय आहे, हेच आम्हाला ठाऊक नाही. तो रक्‍तातला किंवा शरीरातला काही घटक आहे, असे म्हणतात. असेलही! आपल्याला त्याचे काय?

यापुढे आम्ही अत्यंत जबाबदार आणि आक्रमक विरोधी पक्ष म्हणून कामगिरी बजावणार आहो. म्हंजे नेमके काय करायचे, असे आम्ही प्रदेशाध्यक्ष मा. चंदुदादा यांना विचारले असता, त्यांनी दोन्ही हातांच्या बोटांचे जुडगे एकमेकांवर आपटून दाखवले. पाच वर्षे आता बोटांचे जुडगे एकमेकांवर आपटायचे आहेत म्हंजे नेमके काय? हे मात्र कळलेले नाही. कळेल यथावकाश. काय घाई आहे?

Web Title: dhing tang article politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com