ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या जीवाला धोका? पालघरमध्ये शिंदेंविरोधात अघोरी जादूटोणा, वाचा काय घडलंय?

ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या जीवाला धोका? पालघरमध्ये शिंदेंविरोधात अघोरी जादूटोणा, वाचा काय घडलंय?

राज्यातील अघोरी जादूटोणा आणि नरबळींचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने जादूटोणा प्रतिबंध कायदा केलाय. 2013 पासून या कायद्याची अंमलबजावणीही सुरू झाली. पण तरीही जादुटोण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. आता तर एका मंत्र्यावरच काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आलाय. 
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शिंदेंच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केल्याचं समोर आलंय. जादूटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्यात.

विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली इथल्या एका घरात तांदळामध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो ठेवून काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला. शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, अबिर, लिंबासह पांढरा कोंबडा ठेवण्यात आला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी हे साहित्य जप्त केलंय.शिंदेंच्या जिवाला धोका व्हावा, किंवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासातून उघड झालीय.

अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरू वारडी हे दोघेजण अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी लोकांकडून ते पैसेही उकळत असल्याची बाब समोर आलीय. जव्हार पोलीस ठाण्यात फसवणूक तसंच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या टोळीच्या सूत्रधारांचाही पोलिस शोध घेतायत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com