राज्यात हा मतदारसंघ १०० टक्के विधवाप्रथा मुक्त ठरणार; रुपाली चाकणकरांनी घेतला पुढाकार
पुणे : आज एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पतीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते. या कुप्रथांना मूठमाती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या पुढाकाराने २९ ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरुद्ध ठराव पारित करण्याचे ठरविले आहे. ( Rupali Chakankar Latest News )
महाराष्ट्र शासनाने व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील (Pune) खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी उद्या हा ठराव मंजूर करण्याचे ठरविले आहे.
अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल.मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती.आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.