CM Eknath Shinde: रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंचा 'असा' आहे संघर्षमय प्रवास

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज तशी घोषणा केली.
Maharashtra New Chief Minister Eknath Shinde
Maharashtra New Chief Minister Eknath ShindeSaam TV

ठाणे: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज तशी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील असा अंदाज लावण्यात येत होता. तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असे बोलले जात होते. मात्र, आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करून सगळ्यांना धक्का दिला. भाजप शिंदेंना संपूर्ण पाठिंबाही देणार आहे.

रिक्षाचालक ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास -

एकनाथ शिंदेंचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झाला. एकनाथ शिंदे यांचं अकरावीपर्यंत शिक्षण झालं आहे. ठाण्यात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. ते शहरातील वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवता चालवता शिंदे ८०च्या दशकात शिवसेनेशी जोडले गेले. सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

पाहा व्हिडीओ -

महाराष्ट्राची राजधानी मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्वांमध्ये एकनाथ शिंदेंची गणना केली जाते. लोकसभा निवडणुका असोत की, नगरपालिका, त्यामध्ये जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंची साथ मिळणे गरजेचे असल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक (shivsainik) म्हणून काम केलं आणि ठाण्यातील दिग्गज नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत ते नेहमीच राहिले.

एकनाथ शिंदे १९९७ मध्ये ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation) नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१मध्ये पालिका सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा २००२ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. याशिवाय तीन वर्षे ते स्थायी समितीचे सदस्य राहिले. दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर दोन वर्षांनंतरच म्हणजे २००४ साली ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

२००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंचं पक्षात वजन वाढलं. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील स्थान आणखी मजबूत झालं आणि ते ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे मानले जाऊ लागले.

मातोश्रीच्या जवळच्या नेत्यांपैकी एक राहिलेले एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून २००४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर शिवसेनेच्या तिकीटावर एकनाथ शिंदे २००९ , २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून गेले. इतकेच नाही तर, एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

२०१९ मध्ये विधीमंडळ गटनेता

२०१९ साली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते चौथ्यांदा आमदार झाले. शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती. रिक्षाचालक ते नगरसेवक-आमदार आणि मंत्री ते आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदेंचा प्रवास थक्क करणारा आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com