पेट्रोल पंप चालकास लुटणारी टोळी जेरबंद- नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडेपुरी ते जानापुरी रस्त्यावर असलेल्या शहीद दिलीपसिंग पेट्रोल पंप मॅनेजर नागनाथ केंद्रे व मिलिंद लोखंडे हे पेट्रोल पंपाची जमा झालेली रोख रक्कम आठ लाख 43 हजार 160 रुपये घेऊन वडेपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यात जमा करण्यासाठी दुचाकीने जात होते
सोनखेड पेट्रोलपंप व्यवस्थापकास लुटणारी टोळी जेरबंद
सोनखेड पेट्रोलपंप व्यवस्थापकास लुटणारी टोळी जेरबंद

नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंप व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून चाकूने जखमी करुन त्यांच्याकडील साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणारी टोळी अखेर शुक्रवारी (ता. नऊ) रात्री जेरबंद. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून अटक केलेल्या सात आरोपीतांकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहा मे रोजी रोजी सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडेपुरी ते जानापुरी रस्त्यावर असलेल्या शहीद दिलीपसिंग पेट्रोल पंप मॅनेजर नागनाथ केंद्रे व मिलिंद लोखंडे हे पेट्रोल पंपाची जमा झालेली रोख रक्कम आठ लाख 43 हजार 160 रुपये घेऊन वडेपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यात जमा करण्यासाठी दुचाकीने जात होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी नांदेड लोहा महामार्गावरील जानापुरी ते वडेपुरी या गावा दरम्यान दुचाकीवरुन पाठलाग करुन व्यवस्थापक नागनाथ केंद्रे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून गाडी खाली पाडून चाकूचा वार करुन रोख रक्कमेची बॅग लंपास केली होती.

या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासादरम्यान सोनखेड येथील पेट्रोल पंपाच्या जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना व आदेश दिले. त्यावरुन पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी नांदेड शहर व परिसरात गुप्त बातमीदारांना नेमून माहिती घेतली.

हेही वाचा - उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूस

नांदेड शहरातील शिवनगर व गोविंदनगर भागातील राजू सत्यम जाधव व त्याच्या आत्याचा मुलगा नागेश पोचीराम गायकवाड यांनी साथीदारांसह सोनखेड येथील जबरी चोरीचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती श्री. चिखलीकर यांना मिळाली. यावरुन पोलिसांनी राजू सत्यम जाधव व नागेश पोचीराम गायकवाड यांना ताब्यात घेऊन पेट्रोल पंपाचे गुन्ह्याबाबत विचारपूस केली. यावेळी या दोघांनी त्यांचे साथीदार अमोल बालाजी जाधव रा. मुगट ता. मुदखेड, जितेश बाबुराव ढगे रा. मुगट ता. मुदखेड, रामा व्‍यंकटी पवार रा. देगाव, गणेश कोतावार रा. होटाळा (ता. नायगाव- खैरगाव), गणपत देवकर रा. घुंगराळा ता. नायगाव, हल्ली मुक्काम पिंपळगाव, नायगाव, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे रा. मुदखेड, आकाश पंढरीनाथ पवळे रा. जानापुरी ता. लोहा यांनी मिळून दोन दिवस पेट्रोल पंपावर जाऊन रेखीगिरी करुन पूर्वनियोजित व तयारी करुन पंपावरुन रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांना रस्त्यात गाढून त्यांच्याकडील रोख रक्कम पळविल्याची कबुली दिली.

याच दिवशी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली गेट उड्डाणपुलावर एका व्यापाऱ्याला पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या मुख्य आरोपी गुर्मुखसिंह गीलसह पाच आरोपींना यापूर्वीच अटक करुन त्यांच्याकडून चार लाख 88 हजार रुपये व पिस्टल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाक जप्त करुन हा गुन्हा उघडकीस आणला होता. तसेच 2021 मार्चमध्ये बिलोली, देगलूर, मुखेड, लिंबगाव, नांदेड ग्रामीण व इतर ठिकाणी घडलेल्या जबरी चोरीच्या दहा गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केले होते. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन संबंधित ठाण्यात रवानगी केली होती.

येथे क्लिक करा - संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)

सोनखेड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यातील आरोपीकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी एक लाख 50 हजार 700 रुपये रोख रक्कम ५० हजाराचे सात मोबाईल असा दोन लाख 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यात आणखी दोन मुख्य आरोपी फरार असून त्या दोन आरोपींना अटक करुन उर्वरित रक्कम जप्त करण्याचा तपास सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या सातही आरोपींना जप्त मुद्देमालासह कायदेशीर तपासकामी पोलिस ठाणे सोनखेडच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार आशिष बोराटे, सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, सहायक फौजदार जसवंतसिंह शाहू, गोविंद मुंडे, सलीम बेग, दशरथ जांभळीकर, गंगाधर कदम, भारत केंद्रे, मारुती तेलंग, बालाजी पिराजी गायकवाड, संजय केंद्रे, संग्राम केंद्रे, सखाराम नवघरे, रुपेश दासरवार, तानाजी यळगे, मोतीराम पवार, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, रवी बाबर, बालाजी तेलंग, बालाजी मुंडे, राजू पुणेवार, संजय जिंकलवाड, शेख कलीम, पद्मा कांबळे, बालाजी यादगिरवार, शंकर केंद्रे, राजू सिटीकर, महेश बडगु यांनी पार पाडली.

याचबरोबर नांदेड शहर व जिल्ह्यातील व्यापारी नागरिकांनी मोठ्या रकमा बँकेत भरताना किंवा त्या बँकेतून काढताना रोख रक्कम घेऊन ये- जा करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com