मुंबई : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी (Cold In Maharashtra) जाणवत आहे. किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्यानंतर, आता राज्यात पुन्हा किमान तापमानात (Temperature In Maharashtra) किचिंत वाढ झाली आहे त्यामुळे आता पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम राहणार आहे. पण त्यानंतर राज्यातील किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर भारतात देखील पुढचे सात दिवस थंडीची लाट येणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
खरंतर, मागील तीन चार दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस (Heavy Rain) आणि बर्फवृष्टी होत आहे. पुढील आणखी काही दिवस देशात हीच स्थिती कायम राहणार असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले आहे. उद्यापासून पुढील चार दिवस देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
येत्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. सध्या वायव्य आणि मध्य भारतावर 2 सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार झाले आहेत. त्यामुळे 9 जानेवारीपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह बर्फवृष्टीची शक्यता सांगण्यात आली आहे. 07 जानेवारीला पंजाब, पूर्व-उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर 7 आणि 8 जानेवारीला पूर्व मध्य प्रदेशात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पुढील 6-7 दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र 6 ते 8 जानेवारी दरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. 6 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात तर 7 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी 8 जानेवारीला मात्र विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, अमरावती, नागपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.