ठाकरवाडीचे आदिवासी शेतकरी शेषराव गारोळे यांची यशोगाथा; भाजीपाल्याची रोपवाटिका

श्री. गारोळे हे बारावीपर्यंत शिकलेले पण अत्यल्पभूधरक. त्यांच्या वाट्याला आलेल्या शेतातील बराच सहभाग माळरानात आहे. मालकीचा माळरान खोदून भाजीपाला उत्पादनाची शेती त्यांनी अंदाजे पंधरा वर्षांपूर्वी चालू केली.
ठाकरवाडी येथील शेतकरी
ठाकरवाडी येथील शेतकरी

शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : केवळ दीड एकर शेती असणाऱ्या व ठाकरवाडी (ता. हदगाव) सारख्या डोंगराळ, दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही संघर्षमय जीवन जगणाऱ्या शेषराव गारोळे या आदिवासी शेतकऱ्यांने भाजीपाला रोपवाटिका उभारण्याचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. ही रोपवाटिका कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय पत्नी व मुलाचा सहकार्यातून एप्रिल महिन्यात केवळ तीन दिवसात मजबूत पद्धतीने उभारली आहे.

श्री. गारोळे हे बारावीपर्यंत शिकलेले पण अत्यल्पभूधरक. त्यांच्या वाट्याला आलेल्या शेतातील बराच सहभाग माळरानात आहे. मालकीचा माळरान खोदून भाजीपाला उत्पादनाची शेती त्यांनी अंदाजे पंधरा वर्षांपूर्वी चालू केली. ठाकरवाडी हे गाव भाजीपाला उत्पादनासाठी ओळखले जाते. पण भाजीपाल्याचे रोपटे खरेदी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना बाहेरगावी आर्थिक शारीरिक त्रास सहन करुन ये- जा करावी लागायची. हीच बाब हेरुन गारोळे यांनी स्वतः च्या शेतात अंदाजे २४ शे स्क्वेअर फुट जागेत तीस हजार रुपये खर्च करुन लाकडी पद्धतीची मजबूत व सुरक्षित रोपवाटिका उभारली. रोपवाटिकेत खेळती हवा राहण्याची काळजी घेतली आहे.

हेही वाचा - मनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)

अतिवृष्टी, उन्हाचा कडाका, वादळीवारे, कीड आदींपासून रोपट्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन थरांचे सुरक्षा आवरण करण्यात आले आहे. रोपवाटिकेत टमाटे, वांगे, मिरची, फुलगोबी यांचे रोपटे विक्रीसाठी तयार केले जात आहे. भाजीपाला बियाणे, ट्रे, कोकोपिठाच्या खरेदीवर तीस हजार रुपये खर्च आला आहे. रोपवाटिकेतील रोपट्यांवर दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी फवारले जाते. यामुळे रोपट्यांचा टवटवीत ताजेपणा टिकून राहतो. गारोळे यांची पत्नी सुलोचनाबाई या निरक्षर असूनही रोपवाटिकेच्या उभारणीनंतर सांभाळ करताना कोणतीच कसर ठेवत नाहीत. 'नवऱ्याचे पिठ अन् पत्नीचे मीठ' याचे त्या कटाक्षाने पालन करतात.

या रोपवाटिकेतून हदगाव, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, तामसा भागातील भाजीपाला उत्पादकांनी ३० हजार रोपट्यांची विक्री झाली आहे. अंदाजे वीस हजार रुपयांचा नफा तीन महिन्यात गारोळे दांपत्याच्या पदरी रोपवाटिकेतून पडला आहे. यामुळे दोघांचाही उत्साह वाढला असून रोपवाटिकेत एक लाखापर्यंत रोपे उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू आहे. अनेक भाजीपाला उत्पादक येथील रोपट्यांची ॲडव्हान्स बुकिंग करीत आहेत. फारसा अनुभव नसतानाही गारोळे दाम्पत्यांनी भाजीपाला रोपवाटिकेत व्यवस्थापन कौशल्य सिद्ध केले आहे. ठाकरवाडी परिसरातील भाजीपाला उत्पादकांना प्रवास व आर्थिक दृष्ट्या सोयीची येथील रोपवाटिका ठरत असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करुन समाधान व्यक्त होत आहे.

येथे क्लिक करा - हर्षद शेख अमिनोद्दिन यांचे मेहुणे हे त्यांचा सायकल रिक्षा घेऊन मराठवाडा मशनरी या दुकानासमोर ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी जात होता

" ग्रामीण भागात भाजीपाला रोपवाटिकेचा पहिला प्रयोग डोंगराळ व दुर्गम भागात करताना धाकदुकी होती. जिल्हा कृषीविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख, तालुका कृषीअधिकारी राजकुमार रणवीर, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक सतीश खानसोळे यांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन, पत्नी व मुलगा अनिल यांचे सहकार्य उपयोगी पडले. भाजीपाला उत्पादकांचा प्रतिसाद बघून ही रोपवाटिका रॅकपद्धतीने वाढविण्याचा विचार आहे.

- शेषराव गारोळे, भाजीपाला रोपवाटिका चालक, ठाकरवाडी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com