Raj Thackeray Rally in Pune: राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेला परवानगी, 'या' १३ अटी

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना स्वारगेट पोलिसांनी १३ अटी घातल्या आहेत.
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySaam Tv

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. या सभेला परवानगी देताना स्वारगेट पोलिसांनी १३ अटी घातल्या आहेत. राज ठाकरे यांची उद्या, रविवारी सकाळी शहरातील गणेश कला क्रीडा केंद्र या ठिकाणी सभा होत आहे. या सभेपूर्वी मनसेचे नेते वसंत मोरे (vasant More) यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सभेच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला होता.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या सकाळी १० वाजता शहरातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे ही सभा होत आहे. या सभेसाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर नेत्यांनी गुरुवारीच स्वारगेट पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज सादर केला होता. २२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी १३ अटींवर या सभेला परवानगी दिली आहे.

या आहेत अटी

१. ही जाहीर सभा २२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार असून, कार्यक्रमाचे ठीकाण आणि वेळेत कोणताही बदल करू नये.

२. सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजांत धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल, तसेच विशिष्ट समाजाच्या आणि व्यक्तींच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी

३. सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किंवा ते पाळत असलेल्या रुढी परंपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घेतली जावी.

४. सभेमध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच सभेच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांतून येताना किंवा जाताना इतर धर्म/जाती/पंथ यावर टीका-टिप्पणी, तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणी दाखवणार नाहीत.

५. कार्यक्रमादरम्यान, कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नयेत. किंवा प्रदर्शन करू नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी

६. अट क्रमांक २ आणि ५ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या संबंधितांना कळवण्याची आणि अटी शर्तींबाबत अवगत करण्याबाबतची जबाबदारी संयोजकांची राहील.

७. या कार्यक्रमाला आयोजकांनी स्वयंसेवक नेमावेत. ते येणाऱ्या नागरिकांना योग्य त्या सूचना देतील तसेच त्यांच्या आसनव्यवस्थेच्या ठिकाणावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होणार नाही याकरिता क्षमतेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. जेणेकरून गोंधळ, अव्यवस्था, चेंगराचेंगरी असा अनुचित प्रकार टाळता येईल. तसा अनुचित प्रकार घडला तर आयोजकांना जबाबदार धरले जाईल.

८. सभेच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक जागी लावण्यात येणारे स्वागत फलक हे रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी

९. आयोजकांनी मुख्य व्यासपीठावर उपस्थितांची संख्या नियोजित व निश्चित ठेवावी त्याबाबत वेळेत पोलीस विभागाला अवगत करावे. जेणेकरून अनपेक्षित कुणीही अनोळखी व्यक्ती व्यासपीठावर येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही याबाबत काळजी घेतील.

१०. सभेच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाबाबत सरकारने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत योग्य ती काळजी घेतील. तसेच सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि ध्वनिप्रदूषण नियम २००० परिशिष्ठ नियम ३(१), ४(१) अन्वये नियमांचे पालन करावे.

११. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेबाबत फ्रिस्किंग चेकिंग करण्याचा अधिकार पोलिसांना राहील. त्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी.

१२. कार्यक्रमादरम्यान कुठलीही अत्यावश्यक सुविधा उदा. रुग्णवाहिका, दवाखाना, बस सेवा, दळणवळण सेवा यांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.

१३. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या आसनव्यवस्थेबाबत योग्य ती काळजी घ्यावी. त्यांना स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी इत्यादी आवश्यक सुविधा मिळतील याबाबत प्रयत्न करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com