निवघाबाजार ग्राम पंचायतच्या पत्राला बांधकाम विभागाकडून केराची टोपली

लहान- मोठा पाऊस झाला की येथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. पादचारी, वाहनचालक, व्यापारी या पाण्यामुळे त्रस्त झाले असून या कामाला कोणी वाली उरला नसल्याचे दिसत आहेत.
मनाठा ग्रामपंचायत परिसरात पावसाचे पाणी
मनाठा ग्रामपंचायत परिसरात पावसाचे पाणी

बंडू माटाळकर

निवघा बाजार ( ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : हदगांव ते निवघा मार्ग बाळापुर, हिंगोली हा मुख्य मार्ग असून या मार्गावरुन नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. निवघाबाजार येथील रस्त्याच्या दोन्ही बाजुला बाजारपेठ असून अनेक दुकाने आहेत. दळणवळणाच्या मुख्य रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजुला नाल्याच नसल्याने रस्त्याच्या मध्येच मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. त्यामुळे वाहनचालकासह व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

लहान- मोठा पाऊस झाला की येथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. पादचारी, वाहनचालक, व्यापारी या पाण्यामुळे त्रस्त झाले असून या कामाला कोणी वाली उरला नसल्याचे दिसत आहेत. ग्राम पंचायत निवघा बा. यांच्याकडे या रस्ता दुरुस्तीची मागणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली होती. पण हा रस्ता ग्रामपंचायतच्या हद्दीत येत नसल्याने आम्ही दुरुस्ती करु शकत नाही असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले होते. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास बघता ग्राम पंचायत निवघा बा. यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगांव यांना रस्ता व नाल्या दुरुस्ती करण्यासाठी दोनवेळा लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीची मागणी सुद्धा करण्यात आली.

हेही वाचा - सेल्फीच्या नादात खोल दरीमध्ये पडलेल्या युवकाला जीवनदान

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाची उघाड असली की खड्डे बुजवून डांबरीकरण करुन देवूत असे आश्वासन निवघा ग्रा. पं. ला दिले होते. या बाबत अनेक वृत्तमानपत्रात बातम्याही प्रकाशीत झाल्या. एक महीना पावसाने विश्रांती देवूनही बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात आले नसून, परिसरात काल झालेल्या पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्याला पुन्हा तळ्याचे स्वरुप आले आहे. निवघा बा. ग्राम पंचायतने दिलेल्या लेखी पत्राला बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकल्याचे येथील नागरीकांमधुन बोलल्या जात आहे.

याबाबत बांधकाम उपविभाग हदगांवचे उपविभागीय अधिकारी श्री. भिसे यांना विचारणा केली असता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाले असून, आम्हाला पंधरा मिटरच्या आत रस्ता करता येणार नाही. नाल्या नसल्याने पाणी रस्त्याच्या मध्ये साचत आहे. डिसेंबरच्या बजेटमध्ये या ठीकाणी सिमेंट रस्ता करण्यात येणार असून स्थानिक नागरीक व ग्राम पंचायत सर्वाच्या सहकार्याने अतिक्रमण काढून रस्ता करण्यात येणार आहे. सध्या खड्डे बुजवून रस्त्यावरील पाणी एका बाजूने काढून पर्यायी रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी यावेळी भ्रमणध्वनीवरुन बोलतांना माहिती दिली.रस्ता लवकर दुरुस्ती करुन येथील नागरिक, व्यापारी, व वाहनचालक यांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com