नेवाशात मुरकुटे झाले सक्रिय, गडाखांनी मोठा हात मारलाय

शंकरराव गडाख आणि बाळासाहेब मुरकुटे
शंकरराव गडाख आणि बाळासाहेब मुरकुटे

नगर ः नेवासा तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. विशेष म्हणजे त्याला निमित्त आहे पाणी. पाण्यामुळे ही आग लागली आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. इतक्या दिवस फारसे सक्रिय नसलेले मुरकुटे आक्रमक झाले आहेत.

‘शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून शेतीसाठी येत्या आठ दिवसांत आवर्तन सोडावे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील,’ अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. या वेळी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटणे आदी उपस्थित होते. (Murkute's allegations against Shankarrao Gadakh)

शंकरराव गडाख आणि बाळासाहेब मुरकुटे
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ; अधिसूचनेसाठी पुन्हा मुदतवाढ

तेव्हा कशी स्टंटबाजी केली...

सध्या शेतकरी बांधव हवालदिल आहेत. मी आमदार असताना मुळा धरणातून शेतकऱ्यांसाठी वेळेवर आवर्तने सोडली होती. तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यावेळी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी केली. आता तर ते जलसंधारणमंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता? नेवासे तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. मतदारसंघात ते दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात. त्यासाठी मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो, असा आरोप बाळासाहेब मुरकुटे यांनी केला. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी मुरकुटे यांनी निवेदनात केली आहे. (Murkute's allegations against Shankarrao Gadakh)

फडणवीस यांनी भ्रष्टाचार उघड केलाय

जलसंधारण विभागामध्ये साडेसहाशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. जबाबदारी स्वीकारून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री आहेत. त्यांचे खात्याकडे लक्ष नाही. ज्यांच्या मतदारसंघातील जनतेला विविध प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे, ते राज्याचे प्रश्न काय सोडविणार? जलसंधारण विभागाकडे मंत्रिमहोदयांचे दुर्लक्ष आहे. त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com