साक्री (धुळे) : खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे पूर्ण काम १ ऑक्टोबर २०२१ पासून शालार्थ प्रणालीशी संलग्न करून ऑनलाइन होणार आहे. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या कपातीची माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे. तसा शासन निर्णय सहसचिव इम्तियाज काझी यांनी जारी केला आहे. (dhule-news-functioning-of-the-provident-fund-will-be-linked-to-the-school-system)
मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १ एप्रिलची आरंभीची शिल्लक वेतन अधीक्षक व भविष्य निधी पथकाने भविष्यनिर्वाह निधी प्रणालीवर ३१ डिसेंबरपर्यंत नोंदवावी. १ एप्रिलपासून वेतनातून कपात होणाऱ्या भविष्यनिर्वाह निधीच्या कपातीची नोंद भविष्यनिर्वाह निधी प्रणालीत यापुढे आपोआप होणार आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्व देयकांच्या नोंदी वेतन अधीक्षक व भविष्य निधी पथकाने ३१ डिसेंबरपर्यंत भविष्यनिर्वाह निधी प्रणालीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व देयके करावी लागणार सादर
मुख्याध्यापक व प्राचार्यांनी १ ऑक्टोबरपासून भविष्यनिर्वाह निधीची सर्व देयके भविष्यनिर्वाह निधी प्रणालीत ऑनलाइन व हार्ड कॉपीमध्ये वेतन अधीक्षक व भविष्य निधी पथकास सादर करावीत. देयके सादर करण्यापूर्वी संबंधितांच्या १ एप्रिलची आरंभीची शिल्लक व १ एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान अदा केलेल्या सर्व देयकांच्या नोंदी घेतल्याची खातरजमा करावी. त्यानंतर वेतन अधीक्षक व भविष्य निधी पथकाने देयक भविष्यनिर्वाह निधी प्रणालीद्वारे मंजुरी देऊन कोशागार कार्यालयास विहित पद्धतीने सादर करावी.
गोंधळ थांबणार?
प्रणालीचे कामकाज शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली करावे. सर्व संचालकांनी प्रणालीचे संनियंत्रण करावे, असे आदेशात नमूद केले आहे. शासन निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळीच भविष्यनिर्वाह निधीचा तपशील पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी भविष्यनिर्वाह निधी कपातीबाबत होणारा गोंधळ थांबणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.