IPL Secial | हे इम्प्रोवायझेशन चे प्रकार अगदीच कुरूप आहेत...

IPL Secial | हे इम्प्रोवायझेशन चे प्रकार अगदीच कुरूप आहेत...

वन डे आणि T 20 क्रिकेटने फलंदाजी आणि गोलंदाजीत काही नवे प्रयोग आणले. नकल बॉल, कॅरम बॉल,दिलस्कूप,रिव्हर्स स्वीप वगैरे. फलंदाजीत आलेले प्रयोग म्हणजे डोळ्यावर अत्त्याचार करणारे आहेत असे म्हणले तर वावगे ठरू नये. वरचेवर खेळात उत्क्रांती होत असते हे मान्य केले तरी काही गोष्टी अजिबात औचित्यपूर्ण नाहीत हे सांगितले पाहिजे. फक्त परिणामाचा(इम्पॅक्ट)दाखला देऊन वाट्टेल त्या गोष्टीचे समर्थन करणे योग्य नाही. चार धावा,सहा धावा मिळाल्या पण फलंदाजाने शॉट खेळताना जी अवघड पोझीशन करून घेतली होती ती बघता डोळे मिटावेसे वाटले हे सांगायला हवे.क्षेत्ररक्षणात जिम्नॅस्टिकस चे स्वागत आहे.

फलंदाजीत नाही. शैलीचे,तंत्राचे अवडंबर नको असे म्हणले(आजकाल कुठल्याही शुद्धतेला अवडंबर म्हणले जाते हा काळाचा महिमा आहे) तरी इम्प्रोवायझेशनच्या नावाखाली काहीही बघायला मिळते.हार्वे,गावस्कर,विश्वनाथ, गॉवर,सचिन यांनी क्रिकेटच्या पाठयपुस्तकाचे कुठलेही पान कधीही थुंकी लावून उलटले नाही.त्या पुस्तकाच्या पानांचा घमघमाट घेतला,दिला आणि स्वतःच्या नावाच्या रेशमी धाग्याच्या खुणा त्यात ठेऊन ती पुस्तके पुढच्या पिढयांकडे हॅण्डओव्हर केली. त्यांनी इम्प्रोवायझेशन केली नाहीत असे नाही.पण त्यांनी फलंदाजी कधी कुरूप झाली नाही. सचिनने रॅम्प शॉट मारला,लॅपशॉट मारला आणि पॅडल स्वीपही.पण त्यात कुठे दातात डाळिंबाची बी अडकून बसावी असे काहीच नव्हते.उलट ते सगळे लालित्याने झाले.

रिव्हर्स स्वीप,आणि डिलस्कूप म्हणजे वेगवेगळ्या दिशेने केलेली अर्धवट अर्धमत्सेँद्रासन होत.ती करताना फलनदाज बरेचदा इतके स्टंप सोडतात,खाली बसतात,लालबागच्या गर्दीत ढकलल्या सारखे पडतात(धडपडून),मांडी घालतात की टिव्ही च्या फ्रेमच्या बाहेर जातात.मग गोलनदाज त्यांना'टिपण्या'करता त्यांच्या डोक्याच्या दिशेने बीमर टाकतो.मग चेंडू हेल्मेटवर बसतो लगोरीसारखा आणि फलनदाज शलभासनात कोसळतो. फार लागले तर शवासनात स्ट्रेचरवर न्यावे लागते. नटराजा शॉट आणि स्वीप याच्या मधल्या ह्या दिलस्कूप ने थैमान घातले आहे.झिंबाबवेच्या डगलस मारिलिअर ने हा शॉट अचानक वापरून भारताविरुद्ध सामना जिंकला होता.तो फाईनलेगला मारत होता.आता त्याच्या नवीन आवृत्या लॉंगलेग,स्क्वेअर लेग पर्यंत जातात.एक थर्ड मॅनला उलटा स्कूप सुद्धा उचलला जातो.त्या करता फलनदाज मासा पकडायला मच्छिमाराने जाळे पुढे करून उभे रहावे तसे बॉलरने पळायला सुरुवात केली की बॅट पुढे करून उभा रहातो.आनंद आहे. धावा मिळतायत ना मग झाले असे म्हणणे म्हणजे ताशाच्या काठयांनी तबला वाजवून(?) आवाज येतोय ना असे म्हणण्यासारखे आहे. कुणी काहीही म्हणा हे शॉट फलंदाजीला कलंक आहेत असे आमचे ठाम मत आहे. कुणाला पटो अथवा न पटो.यावर नो कॉम्प्रमाईज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com