... तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो - रोहित पवार

... तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो - रोहित पवार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी- कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे गणित आपण सोपे केले. पुढील लोकसभा निवडणूक ही सर्व विरोधकांनी एकत्रित लढली तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा हे तुम्ही आम्ही पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतो असा विश्‍वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलतांना रोहित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या मुद्याला हात घातला. व्यासपीठावर उपस्थित शिवसेना आमदार अंबादास दानवे यांना उद्देशून रोहित पवार म्हणाले, "साहेब अजूनही तरूण आहेत, त्यामुळे देशात मध्यावधी निवडणुका झाल्या आणि आपण पुन्हा एकजूट दाखवली तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकतो. पवार साहेबांवर लोकांचा आणि लोकांचा साहेबांवर विश्‍वास आहे. ते आहेत म्हणूनच आम्ही देखील आहोत, आमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सांगतानाच रोहित पवार यांनी शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असे आपल्या भाषणातून अधोरेखित केले. 

दादांच्या कार्यक्रमाला लोक वेळेआधीच येतात.. 
नियोजित कार्यक्रम उशीरा सुरू झाल्यामुळे रोहित पवार यांनी आयोजकांनाही टोला लगावला. यापुढे दहा वाजेचा कार्यक्रम वेळेवरच कसा सुरू होईल याचा आपण प्रयत्न करू, हळूहळू सवय व्हायला लागेल असे सांगतांनाच त्यांनी अजित पवारांचे उदाहरण दिले. सुरुवातीच्या काळात बारामतीमध्ये जेव्हा दादांच्या सभा व्हायच्या तेव्हा एक-दीड तास उशीरा लोक यायचे. दादा मात्र वेळेवर हजर व्हायचे आणि दहा-वीस लोकांसमोर भाषण करून निघून देखील जायचे. मग नंतर आलेले लोक विचारायचे सभा किती वाजता सुरू होणार आणि त्यांना सांगितलं जायंच की दादा आले आणि भाषण करून निघून पण गेले. त्यामुळे आता अजित दादांचा कार्यक्रम असला की लोक दहा मिनिटे आधीच येऊन बसतात असा चिमटाही रोहित पवारांनी यावेळी काढला. 

WebTittle : ... then Marathi man can become the Prime Minister of the country - Rohit Pawar


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com