गडकरी का म्हणाले, ...तर देशाला भयंकर किंमत मोजावी लागेल

गडकरी का म्हणाले, ...तर देशाला भयंकर किंमत मोजावी लागेल

नवी दिल्ली : प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही विसरलो तर त्याची भयंकर किंमत देशालाच नव्हे तर जगाला मोजावी लागेल आणि भविष्यही अंधारलेले असेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून नव्या पिढीपर्यंत समग्र सावरकर पोहोचवावेत, अशी सूचनाही त्यांनी सावरकरप्रेमींना केली. 

सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे आयोजित सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी बोलताना गडकरी यांनी पाच हजार वर्षांत मशीद तोडणारा व तलवारीच्या बळावर जबरदस्तीने धर्मांतरे करणारा एकही हिंदू राजा झाला नाही असे स्पष्ट केले. सहिष्णू व उदारमतवादी भारतीय संस्कृती ही ‘फक्त आम्ही चांगले, बाकी सारे काफीर’ या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असेही सांगितले. सामाजिक सुधारणांचा आग्रह व जातीयतेच्या प्रथेचा नाश आदींबाबत सावरकरांनी खूप आधीच भूमिका घेतल्या होत्या, असे मतही गडकरी यांनी मांडले. 

शहांचा संदेश 
या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप गुरुवारी झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर फडके यांच्या स्नुषा चित्रा फडके, माजी राज्यपाल राम नाईक व ओ. पी. कोहली, रवींद्र साठे आदी या वेळी उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा दिल्लीतील अशांत परिस्थितीमुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. 

सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभाव 
सावरकरांना आम्ही विसरलो तर देशाचे तुकडे करणारी 1947 सारखी परिस्थिती पुन्हा अनुभवू शकतो, असा इशारा गडकरी यांनी दिला. ते म्हणाले, की धार्मिक कट्टरतावाद व दहशतवादाचे चटके अमेरिकेसह साऱ्या लोकशाही युरोपीय देशांना बसत आहेत. आता तेदेखील जी भूमिका घेत आहेत, ती सावरकरांच्या इशाऱ्याशी जुळणारी आहे. छत्रपती शिवरायांनीही कोणत्याही धर्माच्या महिलेशी मातेसमान व्यवहार करावा व कोणत्याही धार्मिक स्थळाचा अवमान करू नये, अशा सूचना सैनिकांना दिल्या होत्या. सेक्‍युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर सर्वधर्मसमभाव असा असल्याचेही गडकरी म्हणाले.

Web Title: Minister Nitin Gadkari warned Indian people

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com