Nisarga Cyclone | मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर 'निसर्ग' वादळ 

Nisarga Cyclone | मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर 'निसर्ग' वादळ 

मुंबई: वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या स्थितीनुसार मुंबईपासून २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे.निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.

चक्रीवादळामुळे लाटा नेहमीच्या उंचीपेक्षा एक ते दोन मीटर अधिक उंच उसळतील. बुधवारी सकाळी १० आणि रात्री दहाच्या सुमारास अनुक्रमे ४.२६ आणि ४.०६ मीटर उंचीच्या लाटा मुंबईमध्ये उसळण्याची शक्यता आहे. तर ४ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास ४.५६ मीटर इतकी लाटांची उंची असेल.रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर येथे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथेही पाऊस पडेल. बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मुंबईतील आकाश ढगाळ होते. क्वचित काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम सरी कोसळल्या. 

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.  


'झाडांच्या फांद्या पडणे, झाडे पडणे, केळी, पपई अशी झाडे उन्मळून पडू शकतात. किनारपट्टीवरील पिकांना चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. मिठागरांनाही चक्रीवादळामुळे संभाव्य धोका आहे.निसर्ग'ची तीव्रता 'अम्फन'इतकी नसेल असाही दिलासा देण्यात येत आहे. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण चार तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. कच्च्या रस्त्यांवर परिणाम होऊ शकतो. निसर्गच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावांतील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. मात्र, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्याने चक्रीवादळ आले तर काय करायचे, काय तयारी हवी, त्याची तीव्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे आणि अनभिज्ञतेचे वातावरण दिसले. चक्रीवादळाबद्दल सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून संदेश प्रसारित होणे सोमवारी रात्री सुरू झाल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. चक्रीवादळाचा मार्ग, त्यानुसार पूर्वेकडील राज्यांमध्ये घेतली जाणारी काळजी पाहता महाराष्ट्रासंदर्भात मात्र इतक्या उशिरा का जाग आली, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

WebTittle :: Nisarga Cyclone | 'Nirsag' storm just a short distance from Mumbai


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com