मेडीकल कॉलेजसाठी एकमताने मान्यता 

मेडीकल कॉलेजसाठी एकमताने मान्यता 

पुणे - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी येणाऱ्या ६२२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास बुधवारी सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली. दहा एकर जागेवर हे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. 

रेल्वे स्टेशनजवळील नायडू हॉस्पिटलच्या जागेवर ते होणार आहे. महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन केला जाणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी होती. काँग्रेस आघाडीच्या काळात महापालिकेच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली होती. मात्र, हा प्रस्ताव कागदावरच राहिला. दरम्यान, स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रकात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने हॉस्पिटल उभारण्यासाठी तरतूद केली. त्यावर प्रशासनाने एका सल्लागाराची नेमणूक करून, या प्रकल्पाचा आराखडा तयार करून घेतला. सल्लागाराने त्यामध्ये तीन पर्याय दिले होते. त्यापैकी वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करावे, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता. ट्रस्टींमध्ये गटनेत्यांचा समावेश करण्याची  उपसूचना या वेळी अरविंद शिंदे यांनी मांडली. उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

प्रस्तावित ट्रस्टमध्ये महापालिका पदाधिकारी, अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश असणार आहे. हे महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी ट्रस्टची असेल. अहमदाबाद महापालिकेने अशाप्रकारचे महाविद्यालय सुरू केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अभ्यासक्रम आणि प्रवेश शुल्क हे महाविद्यालय ठरवणार आहे. महाविद्यालय चालवण्यासाठी होणारा खर्च आणि औषधोपचार या रकमेतून भरून काढण्यात येणार आहे. बांधकामासाठी येणाऱ्या खर्चासाठी महापालिका सात वर्षांमध्ये अंदाजपत्रकात तरतूद करणार आहे; तसेच पदांची निर्मिती व भरती ट्रस्टच्या माध्यमातून होईल. बांधकाम, यंत्र-सामग्री, मनुष्यबळ यासाठी सात वर्षांत टप्प्याटप्प्याने ६२२ कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. ट्रस्ट स्थापन केल्यास महाविद्यालय चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा महापालिकेला सहन करावा लागणार नाही.

असे असेल महाविद्यालय
    नाव : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
    जागा - दहा एकर
  अपेक्षित खर्च - ६२२ कोटी 
  कोठे - नायडू हॉस्पिटलच्याजागी 
  चालवणार कोण - वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट
  अर्थसंकल्पात तरतूद : सात वर्षे


Web Title: The Medical College recognized

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com