अयोध्या भेटीने शिवसेना फायद्यातच !

अयोध्या भेटीने शिवसेना फायद्यातच !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर अयोध्येचा दौरा केला. प्रभू रामाच्या जन्मभूमीचं दर्शन घेतलं आणि संतमहंतांचा आशीर्वादही मिळवला. फक्त एवढ्यासाठीच ते अयोध्येला गेले होते का, असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. एवढ्यासाठी इतका गाजावाजा करायची काय गरज होती,  रामाचं दर्शनच घ्यायचं होतं, तर मग इतकी वर्षं का नाही घेतलं, निवडणुका जवळ आल्यानंतरच राम का आठवला, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जातील. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक प्रयत्न !  

...तर आम्हीही तुमचा "राम" हिसकावू शकतो !

महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल आणि त्यात आपलं नाणं खणखणीत वाजवायचं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंच पाहिजे, असा एकंदर प्रघात निर्माण झालाय. हाच प्रघात प्रमाण मानून शिवसेनेनं आतापर्यंत वाटचाल केलीय. पण मागच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दूर केलं आणि शिवसेनेच्या शिवप्रेमाचा फायदा करुन घेतला. याचाच वचपा  काढण्यासाठी शिवसेनेनं भाजपचा "राम" हिसकावून घेण्याची खेळी खेळली. तुम्ही आमचे राजे घेणार असाल, तर आम्हीही तुमचा राम घेऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी शिवसेनेनं राममंदिराचा मुद्दा चर्चेत  आणला आणि अयोध्येला धडक देऊन त्याची झलकही दाखवून दिली.  

राम आस्थेपेक्षा राजकारणाचाच विषय ! 

राम हा आपल्या देशात जितका आस्थेचा विषय आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त राजकारणाचा विषय आहे, हे मान्य करावंच लागेल. याचं कारण म्हणजे याच मुद्याचा आधार घेत भारतीय जनता पक्षानं सत्तेचा सारीपाट जिंकला होता. राममंदिर निर्माणाचा विषय तेव्हापासून भाजपच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात अग्रक्रमानं येत असतो आणि येत राहणार आहे. आता केंद्रात भाजपचं सरकार येऊन साडेचार वर्षाचा काळ लोटला. पण या काळात लोकांच्या आशा-अपेक्षा म्हणा किंवा सत्तेवर येण्यासाठी जी मोठमोठी स्वप्नं दाखवली गेली, ती पूर्ण करता आली नसल्याने भाजपची चिंता वाढली आहे. यामुळंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातल्या इतर संघटनांच्या माध्यमातून राममंदिराचा मुद्दा चर्चेत आणण्याची प्रक्रिया सुरु झाली.  आणि येत्या काही दिवसात ती आणखी वेग घेईल, असे संकेत मिळू लागले आहेत. 

शिवसेनेचं सुरक्षित अंतर राखण्याचं धोरण

केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असतानाही मंदिर उभारणीचा तिढा सुटू शकत नाही, ही चिंता भाजपसह त्याच्या मित्र पक्षांना सतावू लागलीय. भाजपला. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही  चिंता जास्त सतावत आहे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींची उभी केली गेलेली विकासाभिमुख  नेत्याची प्रतिमा. राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर आणायचं म्हटलं की, मोंदींची ही प्रतिमा मोडीत काढावी लागणार आहे आणि तेच भाजपसाठी जास्त अडचणीचं ठरु लागलंय. या अडचणीमुळंच भाजपच्या प्राधान्यक्रमातून राममंदिराचा विषय हळूहळू मागं पडू लागल्याचं दिसत आहे. एकीकडं केंद्रातल्या सरकारबाबत लोकांचा झालेला अपेक्षाभंग आणि राज्यातही सत्ता असतानाही काही ठोस करता न आल्याची रुखरुख शिवसेनेसारख्या निष्ठावंत मित्राला लागून राहिली. या चिंतेतूनच शिवसेनेनं भाजपपासून दोन हात दूर राहण्याची खेळी खेळायला सुरुवात केली. यामागं भाजपला मिळत असलेलं घवघवीत यश आणि या यशाच्या बरोबरीनं भाजप नेत्यांचा वाढत गेलेला अहंकार हेही एक प्रमुख कारण आहे. याच अहंकारामुळं आम्हाला आता कोणाची गरज नाही, हेच वेळोवेळी दाखवून देण्याचं काम केंद्राबरोबरच राज्यातल्या नेत्यांनी केलं, त्यामुळंच शिवसेनेनं सुरक्षित अंतर राखण्याचं धोरण स्वीकारलं. 


बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा डाव ? 

राज्यातल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलंय. दसरा मेळाव्यातही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. हे करतानाच राममंदिराच्या विषयालाही हात घातला आणि अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. हा दौरा घोषित करुन भाजप वर्तुळाात खळबळ उडवण्याची आणि संघ आणि संघपरिवाराशी जवळीक वाढवण्याचे संकेत देण्याची खेळी उद्धव ठाकरेंनी खेळली आणि ती काही अंशी पूर्ण झाली, असं म्हणण्यासारखी स्थिती त्यांच्या अयोध्या दौ-यानंतर निर्माण झालीय. अयोध्येत त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी उभं केलेलं चित्र संघ आणि संघपरिवाराला निश्चितच सुखावणारं होतं. उद्धव ठाकरेंनी विधानसभा स्वबळावर लढण्याची स्पष्ट भूमिका घेतलेली असली, तरी लोकसभेबाबत संदिग्धता राहील, याची काळजी घेतली आहे. त्यामुळं देशाच्या राजकारणात शिवसेनेची ताकद दाखवून] देण्याचं आणि त्याआधारे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं काम या अयोध्या    दौ-यामुळं साधलं गेलंय, असं म्हणायला वाव निर्माण झालाय.

विरोधकांनाही स्पेस मिळू नये म्हणून ? 

अयोध्या दौरा करण्यामागं जसं भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव होता, तसाच विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनाही कम्फर्ट झोन द्यायचा नव्हता आणि म्हणूनच येणा-या निवडणुकीत कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेणं क्रमप्राप्त होतं. या भूमिकेमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्याचं निमंत्रण घेऊन आपल्याकडं येणार नाहीत आणि आपल्याला स्वबळाचा अंदाज घेण्यासाठी २८८ विधानसभा मतदारसंघाचं मैदानं मोकळं असेल, याची काळजी या दौ-यानं घेतली गेलीय.

WebTitle : marathi news uddhav thackerays ayodhya visit and reasons behind it  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com