दिल्लीत सोनिया गांधी-शरद पवार करणार चर्चा 

दिल्लीत सोनिया गांधी-शरद पवार करणार चर्चा 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. 17) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे. 

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर दोन आठवडे राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून, या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. या वेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.

सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल मुंबईत आले होते. त्यांनी पवार यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून शिवसेनेसोबत पुढील चर्चा करण्याचे सूचित केले होते. या अनुषंगाने सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांत सामाईक समान कार्यक्रम ठरविण्यासाठी मुंबईत बैठका झाल्या.

या बैठकांत निश्‍चित केलेला अहवाल सोनिया गांधी यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येणार आहे. आता उद्या शरद पवार दिल्लीत दाखल होणार असून, राज्यातील सत्तास्थापनेवर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

दिल्ली येथे जाण्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (ता. 17) पुण्यात आयोजित केली आहे. राज्यातील सत्ता स्थापन करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करून त्यानंतर पवार दिल्लीसाठी रवाना होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सांगण्यात आले. 

राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी आघाडी उदयास आली आहे. या अनुषंगाने कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सभाषण झाल्याचे समजते.

सोनिया गांधी यांच्याशी ठाकरे यांची अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता उद्धव ठाकरे हे लवकरच नवी दिल्लीला जाणार असल्याचेही शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 


Web Title: Sonia Gandhi and Sharad Pawar meeting in Delhi today

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com