रंकाळ्यात साडेचार फूट लांबीचं महाकाय मृत कासव

रंकाळ्यात साडेचार फूट लांबीचं महाकाय मृत कासव

कोल्हापूर - सुमारे साडेचार फूट लांबीचे महाकाय मृत कासव आज रंकाळा तलावात आढळले. स्थानिक नागरिकांनी त्याला काढले. बरेच दिवस कासव मरून पडल्याने त्यास दुर्गंधी सुटली होती. दरम्यान, मृत कासव सापडले असले, तरी इतक्‍या मोठ्या आकाराची कासवे रंकाळ्यात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

तांबट कमानी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी दुर्गंधी जाणवली. ती नेमकी कुठून येते, याची माहिती घेतली असता तेथेच मृत कासव असल्याचे लक्षात आले. प्रचंड दुर्गंधी असल्याने मात्र ते बाहेर काढण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते. अखेर महेश पाटील, शाहीर राजू राऊत, अमर पाटील, अमर जाधव आदींनी पुढाकार घेऊन कासवाला पाण्याबाहेर काढले. रंकाळा तलाव मोठ्या प्रमाणात जैवविविधतेने समृद्ध आहे. पाणथळ जागा असल्याने पक्ष्यांचे वास्तव्य मोठे आहे.

पूर्वी कासवांचे प्रमाण अधिक होते. पावसाळ्याच्या तोंडावर कासवे हमखास नजरेस पडायची. काही वर्षी जलपर्णींचा विळखा, ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे पाण्याचे प्रदूषण यामुळे कासवांची संख्या कमी झाली. अलीकडच्या काही वर्षांत कासव फारसे नजरेस पडत नव्हते. आज अचानक मोठे कासव आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला. दुर्गंधी सुटल्यानंतर अमर जाधव, राजू राऊत यांनी कंपाउंडवरून उतरून कासव बाहेर काढले. दुर्गंधी अधिक पसरू नये यासाठी कासव कोंडाळ्यात टाकले गेले.

पूर्वी रंकाळा तलावात छोटी-मोठी कासवे आढळून येत होती. प्रदूषणामुळे अलीकडे त्यांची संख्या कमी झाली. रंकाळ्यात अजूनही जे सांडपाणी मिसळते त्यामुळेच या कासवाचा मृत्यू झाला. मृत कासव रंकाळ्याच्या नाल्याच्या बाजूने वाहत येऊन पद्माराजे गार्डनच्या भागात पोचले. त्याचे वजन अंदाजे ४० किलोच्या पुढे होते. अशा पद्धतीने जैवविविधता नष्ट होणे हे गंभीर आहे.
- अमर जाधव, मच्छीमार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com