खडकवासला प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे; तसेच   महापालिकेला सध्या देण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात येणार नाही, असे खडकवासला पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.  त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्त टळले आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने उन्हाळ्यात पुणेकरांना      पाणीकपातीला सामोरे जावे लागेल. पुणे आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पाणीकपात होईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु प्रकल्पात पुरेसे पाणी असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

खडकवासला प्रकल्पात आजअखेर ६.९३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. पुणे महापालिका खडकवासला प्रकल्पातून दररोज १३५० ते १४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) म्हणजेच महिन्याला १.४० ते दीड टीएमसी पाणी घेत आहे. त्यामुळे शहराला जुलैअखरे साडेचार टीएमसी पाणी लागेल. 

सध्या ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि उन्हाळी पिकांसाठी कालव्यातून १२ एप्रिलपासून आवर्तन सुरू आहे. ते ७ मेपर्यंत सुरू राहील. त्यासाठी ठरलेल्या २.६८ टीएमसीपैकी आतापर्यंत दीड टीएमसी पाणी दिले आहे. त्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी उन्हाळी आवर्तनासाठी दिले जाईल. दोन महिन्यांत साधारण पाऊण टीएमसी बाष्पीभवन धरल्यास जुलैअखेर अर्धा टीएमसी पाणी धरणात राहील. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्यास गंभीर पाणीसंकट निर्माण होणार आहे.  

शहरालगतच्या भागात पाणीसंकट 
शहरासाठी पुरेसे पाणी असल्याचे सांगितले जात आहे. तरीही काही भागांत आणि शहरालगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. शहरालगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. त्यासाठी सोसायट्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत, अशी पाटबंधारे विभागाची भूमिका आहे. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. महापालिकेने नियोजनानुसार पाणी घेणे अपेक्षित आहे. 
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Web Title: Sufficient water storage in Khadakvasla dam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com