वीजमीटरसह केबलचाही तुटवडा; प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास

वीजमीटरसह केबलचाही तुटवडा; प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास

पुणे - मीटरचा तुटवडा नाही, असा दावा वारंवार महावितरणकडून केला जातो; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. मीटर तर सोडाच, वीजपुरवठा करणारी वाहिनी एखाद्या ठिकाणी तुटली, तर ती जोडण्यासाठी एचटी-एलटी केबलदेखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या या कारभाराचा प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महावितरणकडे थ्रीफेजच्या मीटरचा तुटवडा आहे. या संदर्भात महावितरणकडे चौकशी केली असता, पुरेसा साठा शिल्लक आहे, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, अद्याप पुणे विभागात वीजमीटर उपलब्ध झालेले नाहीत. त्यांचा अनुभव एका आमदाराला आला. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनी करून वीजमीटरच्या परिस्थितीबाबत विचारणा केली, तेव्हा मीटर उपलब्ध असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, आमदारांनी महावितरणच्या कार्यालयात येऊन वीजमीटर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मात्र अधिकाऱ्यांनी अचानक माघार घेत, "आता मीटर उपलब्ध नाहीत, नागपूरवरून निघाले आहेत, लवकरच ते येतील,' असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील नाव न घेण्याच्या बोलीवर मीटरचा तुटवडा असल्याची कबुली "सकाळ'शी बोलताना दिली.

एवढेच नव्हे, तर ग्राहकांकडून मीटरसाठी होत असलेला पाठपुरावा आणि पावसाळ्यात वीजवाहिन्या तुटल्यानंतर त्यांना जोड देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या एचटी-एसटी केबलचा तुटवडा याकडे सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशननेदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचीदेखील दखल घेतली गेली नाही.

पावसाळ्यापूर्वी या संदर्भातील तयारी दरवर्षी महावितरणकडून केली जाते; परंतु यंदा मीटर खरेदी आणि एचटी-एलटी केबल खरेदीची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची कबुली महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना दिली. यावरून महावितरणच्या "रामभरोसे' कारभारामुळे वीजग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वीजमीटर आणि एचटी-एलटी केबलचा तुटवडा आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी वीजवाहिनी तुटली, तर ती जोडण्यासाठी केबल उपलब्ध होत नाही. याकडे वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन

Web Title: Electric Meter Electric Cable Shortage to Mahavitaran

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com