महाराष्ट्रात पाणीसाठा 61 टक्क्यांवर; मात्र मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच

महाराष्ट्रात पाणीसाठा 61 टक्क्यांवर; मात्र मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच

धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच
पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेशा पाणीसाठ्याअभावी स्थिती चिंताजनकच आहे. 

सोमवारी (ता. १९) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ८७४.६४ टीएमसी (६१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ५८ टक्के पाणी उपलब्ध होते.
विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात सर्वात कमी २८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाड्यात ३१ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ३९ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ८५ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ६० टक्के आणि कोकण विभागात ८६ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा ३ टक्क्यांनी अधिक आहे. गतवर्षी अमरावती विभागात ४३ टक्के, औरंगाबाद विभागात १९ टक्के, नागपूर ४० टक्के, पुणे ८० टक्के, नाशिक ५६ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा झाला होता. 

पश्चिम महाराष्ट्रात पाणीच पाणी
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमधील धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस झाला आहे. राज्यातील एकूण पाणीसाठ्यापैकी निम्म्याहून अधिक पाणीसाठा पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत आहे.

Web Title: 61 Percentage Water Storage in Maharashtra State

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com