राज ठाकरे मराठी मतदारांचा विश्‍वास जिंकणार?

 राज ठाकरे मराठी मतदारांचा विश्‍वास जिंकणार?

उत्तर भारतीयांच्या सभेत राज ठाकरे यांनी हातचे काहीही न राखता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला असला तरी मुळात या कार्यक्रमामागील ठाकरे यांचा हेतू काय होता, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांना उत्तर भारतीय मतपेढीमध्ये शिरकाव करायचा आहे, की उत्तर भारतीयांबाबतची कठोर भूमिका पुन्हा दाखवून मराठी मतदारांमधील विश्‍वास बळकट करायचा आहे अशी चर्चा आहे. 

उत्तर भारतीय महापंचायततर्फे आयोजित सभेत ठाकरे यांनी संपूर्ण भाषण हिंदीत केले. हिंदी ही सुंदर भाषा असली तरी ती राष्ट्रभाषा नाही. मुळात तसा निर्णयच कधी झाला नाही. मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण द्यायला आलो नाही. आयोजकांना माझी भूमिका उत्तर प्रदेश-बिहारमध्येही दाखवायची आहे म्हणून मी हिंदीत बोलत आहे, अशी सुरुवात करून ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना खडे बोल ऐकवले. महाराष्ट्रातील सुसंस्कृत लोकांनी येथे उद्योगधंदे आणले, बाहेरून फक्त गुन्हेगार आले; तर ते आम्ही सहन करणार नाही. येथे खूप गर्दी आहे, त्यामुळे तुमच्या लोकांना सांगा की येथे येऊ नका, असे बोल ठाकरे यांनी सुनावले.

संघर्षाला उत्तर भारतीयच जबाबदार
सच कडवा है, वो समझना चाहिये... आपको भी, अशी सुरुवात करून राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. स्थानिक लोक रोजगारापासून वंचित होणार नाहीत हे पहायला हवे, असे इंदिरा गांधी यांनीच म्हटले होते. उत्तर प्रदेश-बिहार येथील उद्योगांमध्ये तेथील लोकांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातल्या उद्योगांमध्ये मराठी व्यक्तींना प्राधान्य मिळालेच पाहिजे; मात्र महाराष्ट्रातील रेल्वे नोकरभरतीच्या जाहिराती उत्तर प्रदेश-बिहारमध्ये प्रसिद्ध होतात. नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य, फेरीवाल्यांची समस्या या बाबी आम्ही उत्तर भारतीयांना सांगायला गेलो तेव्हा आमच्याशी बोलताना अत्यंत वाईट भाषा वापरली गेली, त्याचमुळे संघर्ष झाला; असेही त्यांनी दाखवून दिले.

माझं हिंदी उत्तम
पहिल्यांदाच हिंदीत भाषण देतोय. काही गैरसमज भाषेच्या बाबतीत असतील. शाळेत असल्यापासूनच माझी हिंदी उत्तम आहे. कारण वडिलांचे हिंदी, उर्दूवर प्रभुत्व आहे.  पण ती राष्ट्रभाषा असेल, असा निर्णय कधी झालाच नाही. मराठीप्रमाणेच सर्व प्रादेशिक भाषांचे महत्त्व आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे.


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com