मुशर्रफना निवडणूक लढण्यास बंदी 

मुशर्रफना निवडणूक लढण्यास बंदी 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानातील निवडणूक लढण्याची दिलेली परवानगी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज नाकारली. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना सशर्तपणे निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी दिली होती. परंतु मुशर्रफ न्यायालयात हजर झाले नाहीत. 

न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुशर्रफना 25 जुलै रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर चित्राल जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुशर्रफ हे विविध खटल्यांप्रकरणी 13 जून रोजी न्यायालयात हजर राहतील, असे सांगण्यात आले होते. परंतु मुशर्रफ हजर न झाल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश साकिब निसार यांनी ताशेरे ओढले.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान मुशर्रफ यांचे वकील कमर अफजल यांनी मुशर्रफ यांचे न्यायालयात हजर राहणे निश्‍चित आहे, मात्र आताच तातडीने येता येणार नसल्याचे सांगितले. मुशर्रफ यांना आणखी वेळ हवा आहे. मात्र ईदची सुटी आणि आजारपणामुळे ते प्रवास करू शकत नाहीत, असे वकिलाने न्यायालयाने सांगितले. त्यानंतर याचिकेवरील सुनावणी अनिश्‍चितकाळासाठी स्थगित केली. याचिकाकर्ता हजर होईल, तेव्हाच सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यादरम्यान मुशर्रफ यांना निवडणूक लढण्याची दिलेली परवानगी मागे घेत असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. परवेज मुशर्रफ हे मार्च 2016 पासून दुबईत असून, त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com