नीतेश राणेंचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट,अतुल रावराणे यांची टीका

 नीतेश राणेंचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट,अतुल रावराणे यांची टीका

कणकवली : शहरातील महामार्ग 15 दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

येथील भाजप कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत, प्रज्ञा ढवण, दीपक सांडव, प्रीतम मोर्ये आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले, "आठ दिवसापूर्वी पालकमंत्री केसरकर यांनी हायवे प्रश्‍नी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांनी पंधरा दिवसांत खारेपाटण ते झाराप या रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि महामार्ग सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आणखी आठ दिवस आमदार राणे यांनी थांबणे आवश्‍यक होते; पण स्टंटबाजीची सवय झालेल्या राणेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्यांना चक्‍क चिखलाची अंघोळ घातली. पुलाला बांधून ठेवले. हा प्रकार पूर्णतः चुकीचा आहे. राणे कणकवली मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांनी विधीमंडळात जाऊन तसेच लोकशाही मार्गाने हा प्रश्‍न सोडवणे आवश्‍यक होते.''

पुढील आठ दिवसापर्यंत हायवे सुरळीत होण्याची आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. या कालावधीत महामार्ग सुरळीत न झाल्यास आम्ही हायवे ठेकेदाराला महामार्गाची पाहणी करण्यासाठी त्याला रस्त्यावर आणणार आहोत; मात्र आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने असेल अशी ग्वाही देखील  रावराणे यांनी दिली. मे महिन्यात आमदार राणे आणि हायवे ठेकेदाराच्या बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी राणेंनी हायवेची कामे पूर्ण करून घेणे गरजेचे होते. आता पावसात महामार्गावर खड्डे पडल्यानंतर ते अधिकाऱ्यांना मारहाण करीत आहेत. आंदोलनावेळी त्यांनी ठेकेदाराला का बोलावले नाही. केवळ हायवे अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा बळी का देता असा प्रश्‍न रावराणे यांनी उपस्थित केला.

खड्डे बुजविण्यासाठी भाजपने काय केले ?
कणकवलीवासीय दोन महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यातून जात आहे. या कालावधीत भाजपच्या नेतेमंडळींनी काय केले? असा प्रश्‍न रावराणे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या खड्डयांप्रश्‍नी संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांचे लक्ष वेधल्याचे उत्तर रावराणे यांनी दिले.

ते हुल्लडबाजीचे आंदोलन
आमदार नीतेश राणेंचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजीचा प्रकार होता. अशा आंदोलनातून काहीही निष्पन्न होणार नाही. उलट जिल्ह्यातील अधिकारी बाहेर गेले तर विकासप्रक्रियाच ठप्प होणार आहे. जनतेचे प्रश्‍न विधीमंडळात जाऊन सोडवता येत नसल्याने राणेंना अशी हुल्लडबाजीची आंदोलने करावी लागत असल्याचीही टीका त्यांनी केली.

Web Title:   Nitech Rane's movement is a publicity stunts- Atul Ravrane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com