जगातील सर्वांत प्रभावशाली नेता म्हणून मोदींची निवड

जगातील सर्वांत प्रभावशाली नेता म्हणून मोदींची निवड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. पाचवा योग दिन शुक्रवारी जगभरात साजरा होत असतानाच मोदी यांना आणखी एक सन्मान प्राप्त झाला. जगातील सर्वांत प्रभावशाली नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अशा बलाढ्य नेत्यांना मागे टाकून मोदी यांना हा मान मिळाला आहे.

2019 मधील जगातील सर्वांत प्रभावशाली नेता कोण, यावर 'ब्रिटिश हेरल्ड'ने वाचकांचा कौल मागितला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाली. निवडीसाठी वाचकांसमोर 25 नेत्यांची यादी ठेवण्यात आली होती. वाचकांनी दिलेल्या पसंतीमधून चार जणांची नावे तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीने निवडली होती. नेत्यांना मिळालेल्या मतांचा व्यापक अभ्यास व संशोधन करून अंतिम निवड करण्यात आली. यात मोदी यांनी बाजी मारली. 

असे झाले मतदान 
मतदानासाठी पारंपरिक प्रक्रियेचा आधार घेण्यात आला नाही. त्याऐवजी "वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) पद्धतीचा वापर करीत 'ब्रिटिश हेरल्ड'च्या वाचकांना मत देणे बंधनकारक केले होते. आपल्या आवडत्या नेत्याचीच निवड व्हावी, यासाठी मतदारांनी सर्व प्रयत्न केले. यातून संकेतस्थळ अनेकदा क्रॅशही झाले. 

नेत्यांना मिळालेली मते 
मतदान प्रक्रिया शनिवारी (ता. 15) समाप्त झाली. यात वाचकांची सर्वाधिक मते मिळवून मोदी जगातील सर्वांत प्रभावशाली नेते ठरले. 'ब्रिटिश हेरल्ड'च्या जुलैच्या आवृत्तीत मोदी यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रसिद्ध होणार आहे. ही आवृत्ती 15 जुलै रोजी प्रकाशित होणार आहे. 

मतांची टक्केवारी 
नरेंद्र मोदी - 30.9 

व्लादिमीर पुतीन - 29.9 

डोनाल्ड ट्रम्प - 21.9 

शी जिनपिंग - 18.1 

लोकप्रियतेत वाढ 
'ब्रिटिश हेरल्ड'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयांकडून सर्वांत जास्त मान्यता मूल्यांकन मिळाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दहशतवादविरोधातील कडक भूमिका व बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेले हवाई हल्ले यामुळे मोदी यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाली. त्याशिवाय 'आयुष्यमान भारत', उज्ज्वला योजना', 'स्वच्छ भारत अभियान' आदी योजनांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे, असे या लेखात नमूद केले आहे.

Web Title: PM Narendra Modi selected as the worlds most influential leader

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com