सोन्याची तस्करी करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक

सोन्याची तस्करी करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक

नवी दिल्ली : ५.२ किलोग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौघांना अटक करण्यात आली. यामध्ये कॅनडातील २२ वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत १.७ कोटी रुपये इतकी आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी हे लुधियानातील एका सोन्याच्या व्यापाऱ्याचे कुटुंबीय आहेत. ते सर्वजण बँकॉकहून दिल्ली विमानतळावर उतरले होते. अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूच्या वडिलांनी आपण याआधीही इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचे मान्य केले आहे, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये २०१६ साली झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत हा क्रिकेटपटू कॅनडाच्या संघाकडून खेळला होता. त्याचे नाव मामिक लुथ्रा असे आहे. मामिककडे कॅनडाचा पासपोर्ट आहे आणि तो तिथला नागरिक आहे. तर त्याचे पालक आणि नातेवाईक यांच्याकडे भारताचा पासपोर्ट असून ते सर्व भारताचे नागरिक आहेत.

शनिवारी सकाळी हे सर्वजण विमानतळावर उतरल्यावर ग्रीन चॅनेलमधून निघाले होते. त्यांच्याकडील सोन्याची त्यांनी कोणतीही माहिती सीमाशुल्क विभागाला दिली नव्हती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही या चौघांना विमानतळावर ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडल्यावर थांबवले. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांच्याकडील बँगांचे स्कॅन केल्यावर त्यामध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे आम्हाला दिसले. त्यानंतर आम्ही त्यांच्या बॅगा उघडून बघितल्यावर आम्हाला सोन्याचे पाच बार दिसून आले. या प्रत्येक बारचे वजन एक किलो आहे. त्याचबरोबर एक छोटा तुकडाही त्यांच्याकडे होता. त्याचे वजन २१८ ग्रॅम होते.

Web Title : Cricketer arrested for gold smuggling

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com