आगामी विधानसभा निवडणुका भाजप अमित शहा यांच्या अध्यक्षपदाखालीच लढवणार ?

आगामी विधानसभा निवडणुका भाजप अमित शहा यांच्या अध्यक्षपदाखालीच लढवणार ?

नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. याचा अर्थ आगामी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका अमित शहा यांच्या अध्यक्षपदाखालीच भाजप लढवेल.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांच्या मुद्द्यावर पक्षाच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची गुरुवारी दिल्लीत भाजप मुख्यालयात बैठक झाली. सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी या पत्रकारांना या बैठकीची माहिती दिली. 2014 नंतर राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानात भाजपचे 11 कोटी सदस्य झाले होते. आता 20 टक्के नवे सदस्य म्हणजेच 2.20 कोटी सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, भाजपसाठी हे संघटन पर्व असेल. शिवराजसिंह चौहान हे या सदस्य नोंदणी अभियानाचे संयोजक असतील, तर दुष्यंत गौतम, सुरेश पुजारी, अरुण चतुर्वेदी आणि केरळमधील शोभा सुरेंद्रन असे चार सहसंयोजक असतील. या सदस्य नोंदणी मोहिमेची रूपरेषा चौहान येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करतील.

सदस्य नोंदणी मोहीम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेतून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईल. केंद्रात गृहमंत्री झालेले अमित शहा हेच तोपर्यंत पक्षाध्यक्ष राहतील. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र, हरियाना, झारखंड, जम्मू-काश्‍मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. 

हे सर्वोच्च यश नाही : शहा 

लोकसभा निवडणुकीतील यश हे भाजपचे सर्वोच्च यश नसल्याचे शहा यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील निकाल हा जातीचे राजकारण, घराणेशाही आणि धार्मिक आधारावर होणारे ध्रुवीकरण हे तिन्ही मुद्दे नाकारणारा होता. उत्तर प्रदेशातील जातकेंद्रित राजकारण संपले आहे, तर ओडिशा, ईशान्य भारतात भाजपने लक्षणीय यश मिळवले. पश्‍चिम बंगालमध्येही हिंसाचाराचा मुकाबला करून यश संपादन केले, याकडे अमित शाह यांनी बैठकीत लक्ष वेधले. 

Web Title: Amit Shah will now Concentrate on Maharashtra to win Assembly Election

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com