नागपुरात दारुड्या मुलाने केला जन्मदात्या वृद्ध आईचा खून

नागपुरात दारुड्या मुलाने केला जन्मदात्या वृद्ध आईचा खून

नागपूर - दारुड्या मुलाने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यासह कवेलूने डोक्‍यावर प्रहार करीत जन्मदात्या वृद्ध आईचा खून केला. ही घटना सोमलवाड्यातील महात्मा फुले झोपडपट्टीत शनिवारी रात्री उघडकीस आली. ममता हिंगे (६०) असे मृत आईचे तर सोनू ऊर्फ मिलिंद हिंगे (४५) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. सोनू हा आई ममता आणि वडील सदाशिव हिंगे यांच्यासोबत महात्मा फुले झोपडपट्टीत समृद्धी बौद्धविहाराजवळ वास्तव्यास आहे. सोनूची बहीण प्रतिभा कुंभलकर हिचे लग्न झाले असून, तीसुद्धा त्याच वसाहतीत राहते.

पूर्वी मॅकेनिक असणारा सोनू पूर्णत: दारूच्या आहारी गेला आहे. यामुळे पत्नीसुद्धा त्याला सोडून गेली. त्याचे वृद्ध वडील एका शाळेत चौकीदार असून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातूनच घर चालते. 

आरोपी सोनू शनिवारी सायंकाळी झिंगलेल्या अवस्थेतच घरी आला. त्यापूर्वीच वडील कामावर निघून गेले होते. घरी एकट्याच असलेल्या आईकडे त्याने पैशांसाठी तगादा लावला. सोबतच वेगळी भाजी करून देण्याची फर्माइश ठेवली. आईने नकार दिला. यामुळे संतापलेल्या सोनूने प्रारंभी आईला हाथबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण सुरू केली. त्याच वेळी हातात लागलेल्या कवेलूने तिच्या डोक्‍यावर प्रहार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. दारूच्या नशेत असलेला सोनू आत झोपी गेला. 
सायंकाळपासून घरातील लाइट बंद होते आणि रात्री उशिरापर्यंत घरातून कोणताही आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली. काहींनी जवळच राहणाऱ्या बहिणीकडे जाऊन तिला बोलावून घेतले. बहिणीने आत जाऊन बघितले असता आई जमिनीवर पडून होती, तर भाऊ झोपलेला दिसला. तिने आईला उठविण्याचा प्रयत्न केला; पण शरीरात कोणतीही हालचाल नसल्याचे तिच्या लक्षात आले.  लागलीच जखमी आईला मेडिकलमध्ये नेले. डॉक्‍टरांनी तपासताच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हिसका दाखविताच सोनूने मारहाणीची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपी मुलाला अटक केली आहे.

Web Title: Drunked son murdered his mother

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com