लोकलमध्ये असा चोरला जातो मोबाईल! (Video)

लोकलमध्ये असा चोरला जातो मोबाईल! (Video)

मुंबई : मुंबईतल्या लोकलमध्ये प्रवास करणं किती जिकरीचं आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आधी गर्दीने त्रस्त झालेल्या
मुंबईतल्या लोकल प्रवाशांसमोर आता एक नवं संकट उभं राहिलं आहे. हे संकट आहे लोकलमधल्या मोबाईल चोरांचं.
गेल्या वर्षभरात मोबाईल चोरीच्या रेकॉर्डब्रेक घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. वेळोवेळी मोबाईल चोरांची आकडेवारी किती
भयंकर आहे, हे देखील समोर येत असतं. अशातच आता आणखी एक मोबाईल चोरीची थरारक घटना समोर आली आहे.

घटना आहे मुंबई लोकलमधलीच.. पण प्रकार घडलाय मुंब्रा स्थानकात. 13 ऑक्टोबरची घटना आहे. 
वेळ सकाळी 6 वाजताची. प्लॅटफॉर्म नंबर दोन वर लोकल आली. सराईतपणे मोबाईल चोरुन हा चोरटा 
धावत्या लोकलमधून उतरला. उतरला कसला, धडपडलाच. पण मोबाईल काही या पठ्ठ्याने सोडला नाही.
मोबाईल धरला आणि पुन्हा उलट्या दिशेनं पळू लागला. यानंतर लगेचच गाडी थांबताच लोकलमधील प्रवासीही 
खाली उतरले. चोराच्या मागे पळू लागले. यानंतर खेळ सुरु झाला पकडापकडीचा. 

या पकडापकडीच्या खेळात पोलिस मागे राहिले असते तरच नवल. आरपीएफ जवान विवेक कटीयार ड्युटीवर होते.
मोबाईल चोराला पकडण्यासाठी तेही धावू लागले. पुढे चोर, मागे पोलिस आणि प्रवासी. पकडापकडीने वेग घेतला. प्लॅटफॉर्मचा
शेवट गाठेपर्यंत शर्यत संपली होती. मोबाईल चोरीची प्रॅक्टीस करताना पळण्याची प्रॅक्टीस चोरासा करता आली नसावी.
सराईतपणे लोकलमधून उतरता तर आलं, पण चोराला पळता काही आलं नाही. 

आरपीएफ जवानाच्या वेगापुढे चोराचे हार मानली. अखेर त्याला पकडून मोबाईलही लोकल प्रवाशाला देण्यात आला.
हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. मात्र या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
मोबाईल चोरुन चालत्या लोकलमधून पळणाऱ्या चोरांच्या मागे धावू नका. जीव धोक्यात घालू नका. 
मोबाईल दुसरा घेता येईल, पण जीव एकच आहे. त्याला जास्त जपायला हवं. 

चोरटे तुमचा मोबाईल सराईतपणे तुमच्या नकळत लंपास करतात. लोकल सुटू लागली की हळूच उतरुन गायब होतात. त्यामुळे
प्रत्येक स्थानकात लोकल थांबताना आणि सुटताना आपल्या मोबाईलची जास्त काळजी घ्या. नाहीतर तुमच्या खिसातला
किंवा हातातला मोबाईल हिसकावून कधीही मोबाईल चोरटे पळ काढतील आणि तुम्ही काहीच करु शकणार नाही.
म्हणून लोकलमध्ये ओरडणाऱ्या ताईंचं म्हणणं सीरियसली घ्या, त्या तुम्हाला आजही सांगत आहे, लोकलमध्ये चढताना, 
उतरताना किंवा प्रवास करताना आपला मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या!

Web Title : Mumbai local train mobile robbery video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com