भाजपला 100 जागा कमी, आता पंतप्रधान कोण हे एनडीए ठरवणार- संजय राऊत

भाजपला 100 जागा कमी, आता पंतप्रधान कोण हे एनडीए ठरवणार- संजय राऊत

मुंबई : 'गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला 100 जागा कमी मिळाल्या, तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष ठरवतील', असे भाकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी लोकसभा निवडणूक आणि शिवसेना-भाजप युती यावर भाष्य केले. 

गेल्या काही दिवसांपासून 'नितीन गडकरी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार' अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. राऊत यांनीही काही दिवसांपूर्वी या विषयावर भाष्य केले होते. त्यावर राऊत म्हणाले, 'पंतप्रधानपदासाठी मी गडकरी यांना पाठिंबा दिलेला नाही. प्रसिद्धी माध्यमे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अशा वावड्या उठविल्या गेल्या. 'गडकरी पंतप्रधान व्हावे' अशी कोणतीही अट आम्ही भाजपला घातलेली नाही. शिवाय, फक्त गडकरीच का? भाजपकडे पंतप्रधानपदासाठी लायक असलेले अनेक उमेदवार आहेत.'' 

गेल्या साडेचार वर्षांमध्ये भाजप-शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले होते. शिवसेनेने सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ज्या मोदींवर टीका केली, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविण्यात शिवसेना तयार आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. 

यावर राऊत म्हणाले, 'आम्ही कायम सत्याच्या बाजूने बोलतो. जमीन अधिग्रहण कायदा असो वा बुलेट ट्रेन, राम मंदिर असो वा नोटाबंदी.. आम्ही धोरणांवर टीका केली आहे. याशिवाय, नेतृत्त्वाचेच म्हटले, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व आहे, बिहारमध्ये नितीशकुमार यांचा चेहरा आहे आणि पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल आहेत..'

Web Title: If BJP gets 100 seats less than LS 2014, NDA will decide about PM, says Sanjay Raut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com