बाबासाहेबांची मूल्यं सशक्त समाजासाठी प्रेरक - श्रद्धा जोशी-शर्मा 

बाबासाहेबांची मूल्यं सशक्त समाजासाठी प्रेरक - श्रद्धा जोशी-शर्मा 

मुंबई : बाबासाहेबांनी दिलेली प्रत्येक शिकवण लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रत्येक पानावर आमच्या जीवनाची मूल्यं आणि तत्त्वे आहेत. आमच्या समाजाचा प्रत्येक घटक आज बाबासाहेब यांच्या विचाराचा पाईक आहे, असे मत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांनी व्यक्त केले. पत्रकार संदीप काळे यांच्या "जय भीम लाल सलाम' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच विलेपार्ले येथील "सहारा स्टार हॉटेल'मध्ये दिमाखात पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या.


या प्रसंगी "महाराष्ट्र इंडस्ट्रियल ऍण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन' आणि "एसएमई चेंबर ऑफ इंडिया'चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, गोदावरी अर्बन बॅंकेच्या अध्यक्षा राजश्री पाटील, रिझवी एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख रुबिना रिझवी, "ग्रंथाली'चे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर, पत्रकार संदीप काळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांची भाषणे झाली. साहित्य आणि उद्योग क्षेत्रातील अनेक महत्त्वाची मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. 


"बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं आहे, ते समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात मोठं पाऊल होतं. तेव्हाही लोकांनी बाबासाहेबाना प्रश्न विचारले आणि त्यांनी आपल्या कार्यातून लोकांना उत्तरं दिली. त्यांनी बहुजनांचा प्रत्येक विषय गांभीर्याने सोडविला. आज महिला सन्मानाने जगतात, त्याचे कारण बाबासाहेब आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक बदलाचे खरे जनक बाबासाहेबच आहेत. 
- श्रद्धा जोशी-शर्मा 
व्यवस्थापकीय संचालक 
महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई 


मराठी साहित्यामधील उत्कृष्ट ग्रंथ म्हणून "जय भीम लाल सलाम' या ग्रंथाकडे पाहिलं जाईल. ग्रंथालीने अनेक पुस्तके केली, जी चळवळीशी निगडित होती. समाजकारणाशी निगडित होती. "जय भीम लाल सलाम' या पुस्तकामध्ये अजून एका पुस्तकाची भर पडली आहे. वाचक या ऐतिहासिक दस्तऐवजाचे नक्कीच स्वागत करतील. 
- सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली प्रकाशक, मुंबई. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला किंवा अस्पृश्य' लोकांसाठी एक चांगलं मार्गदर्शक तत्त्व निर्माण करून दिलेलं आहे. ते त्यांच्या तत्त्वासाठी ठामपणे लढलेसुद्धा. त्या तत्त्वासाठी लढत असताना त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या संधीसुद्धा त्यांना सोडाव्या लागल्या. अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि तोंडही द्यावं लागलं. आंबेडकरांनी दिलेल्या संधींचा उपयोग करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आज आपण एका वरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. 

- राजश्री पाटील 
अध्यक्षा, गोदावरी अर्बन बॅंक, नांदेड, मुंबई. 


समाजाच्या प्रत्येक घटकाने बाबासाहेबांच्या प्रत्येक विचाराचा आधार घेतला आहे. आपण आंबेडकरांची तत्त्वमूल्ये खरंच पाळतो का, हेसुद्धा कुठेतरी तपासून पाहिले पाहिजे. बाबासाहेबांचे नाव सर्व जगात आहे याचा आम्हाला आभिमान आहे. या पुस्तकच्या निमित्ताने एक वैचारिक ठेवा आम्हाला मिळतोय याचा विशेष आनंद वाटतोय. 
- चंद्रकांत साळुंखे 
अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया मुंबई. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com