सूर्यावरील पहिली अंतराळ मोहीम ; "पार्कर सोलर प्रोब' रोबोटिक अवकाश यानाची तयारी अंतिम टप्प्यात

सूर्यावरील पहिली अंतराळ मोहीम ; "पार्कर सोलर प्रोब' रोबोटिक अवकाश यानाची तयारी अंतिम टप्प्यात

वॉशिंग्टन : मानवाची सूर्यावरील पहिली अंतराळ मोहीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या रोबोटिक अवकाश यानाची तयारी अंतिम टप्प्यात असून, हे यान 31 जुलै रोजी फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रावरून अवकाशामध्ये झेप घेणार आहे. सध्या फ्लोरिडातील हवाई तळावर या अवकाश यानाच्या चाचण्या सुरू आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर हे अंतराळ यान तांत्रिकदृष्ट्या पूर्णत्वास जाईल. पुढे " डेल्टा आयव्ही हेवी लॉंच व्हेईकल' या प्रक्षेपकाच्या माध्यमातून ते अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहे. 

प्रक्षेपणानंतर हे अंतराळ यान थेट सूर्याच्या वातावरणामध्ये प्रवेश करेल, याला "कोरोना' असे संबोधले जाते. सूर्याच्या इतक्‍या जवळ जाणारी ही पहिलीच कृत्रिम वस्तू ठरणार आहे. सौर वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर या यानाला तीव्र उष्णता आणि किरणोत्सर्गाचा मारा सहन करावा लागेल. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचे मूलभूत विज्ञान, सौरवादळांची निर्मिती आणि सूर्यापासून उत्सर्जित होणारे पदार्थ जे अन्य ग्रह आणि पृथ्वीजवळील अंतराळ वातावरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. 

कठोर चाचण्या 
पुढील काही महिने "पार्कर सोलर प्रोब'ला अनेक कठोर चाचण्यांना सामोरे जावे लागेल. या अंतराळयानामध्ये इंधन भरणे हेच सर्वात मोठे आव्हानात्मक काम असेल. ते पूर्ण झाल्यानंतर "थर्मल प्रोटेक्‍शन सिस्टिम' अर्थात उष्णतेपासून यानाचे बचाव करणारे कवचदेखील बसविले जाणार आहे. या कवचामुळे अंतराळयानाचा सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून बचाव होणार आहे. 

"पार्कर सोलर प्रोब'च्या माध्यमातून अनेक आश्‍चर्यजनक बाबी समोर येणार आहेत. ही मोहीम वास्तवात येण्यासाठी आमच्या टीमने कठोर मेहनत घेतली आहे. 
अँडी ड्राइजमन, प्रकल्प व्यवस्थापक 

बाह्य भागाचा अभ्यास 
या मोहिमेच्या सात वर्षांच्या काळामध्ये हे यान सूर्याच्या बाह्य भागाचा सखोल अभ्यास करेल. या नव्या माहितीमुळे मागील दशकभरापासून सूर्याविषयी प्रचलित असलेल्या सिद्धातांना तडा जाणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या अंतराळ यानाने संकलित केलेली माहिती सूर्यावरील स्फोट आणि पृथ्वीवरील तंत्रज्ञान, अवकाशातील उपग्रहे आणि अंतराळवीरांना थेट प्रभावित करणाऱ्या घटनांबाबत अंदाज व्यक्त करण्यासाठी उपयोगी पडेल. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com