लोकसंख्येच्या तुलनेत २.५ टक्के वाढीव आरक्षणासाठी कोल्हापुरात ‘गोंधळ’

लोकसंख्येच्या तुलनेत २.५ टक्के वाढीव आरक्षणासाठी कोल्हापुरात ‘गोंधळ’

कोल्हापूर - शासननियुक्त रोहिणी व दादा इदाते आयोग समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाला असणारे २.५ टक्के आरक्षण लोकसंख्येच्या तुलनेत वाढवून मिळाले पाहिजे, तसेच ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पारंपरिक गोंधळी वाद्य, वासुदेव व जोशी समाजातील बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून मोर्चात सहभाग घेतला.

दसरा चौक येथे सकाळी अकरापासूनच कार्यकर्ते व गोंधळी समाजबांधव एकत्रित येत होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, निपाणी, बेळगावसह कर्नाटकमधील अनेक ठिकाणांहून गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजबांधवांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला. समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी महिलांनीही गर्दी केली होती. शिस्तबद्ध आणि पारंपरिक व्यवसायाचे दर्शन घडवत निघालेल्या मोर्चाने शहराचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शिष्टमंडळाने समाजाच्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

प्रमुख मागण्या

  •  दादा इदाते आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू करा
  •  जात दाखल्यासाठी ६० वर्षांचा पुरावा रद्द करावा  
  • पिवळ्या रेशनकार्डसाठी १५ हजार उत्पन्नाची अट रद्द करा
  •  बेघरांना घरे द्यावीत  
  • नॉनक्रिमीलेअरची जाचक अट रद्द करा 
  •  ॲट्रासिटी कायदा लागू करावा  
  • जात वैधता रद्द करावी  
  • इंदिरा आवास योजनेअंतर्गत ५० टक्‍के आरक्षण द्यावे  
  • राजकीय प्रक्रियेत आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग करावा


निवेदनात म्हटले आहे, की गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाला सध्या २.५ टक्‍के आरक्षण आहे. सध्या या समाजाची लोकसंख्या वाढली आहे. त्या पटीत आरक्षणही वाढवले पाहिजे. दरम्यान, यासाठी शासनाने या समाजाची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. हा भटकंती करणारा समाज आहे. त्यामुळे अनेक अत्याचाराला सामोरे जावे लागते. जातवैधता प्रमाणपत्रातील जाचक अटी रद्द केल्या पाहिजेत. कमाल जमीन धारण कायद्याने अतिरिक जमिनी भटक्‍या विमुक्तांना समान दिल्या पाहिजेत. वास्तविक या समाजाचे सर्व हक्क आणि अधिकार सरकार कमी करत आहे. भटक्‍या-विमुक्तांचे आयोग नियुक्त केले; मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. शिक्षणाचे खासगीकरण करून सामान्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे, गोरगरीब लोक शिक्षणापासून पर्यायाने नोकऱ्यांपासून वंचित राहत आहेत याचा शासनाने विचार करावा, अशी मागणीही समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष भोजणे, उपाध्यक्ष अभिजित गजगेश्‍वर, बबनराव कावडे, महेश भिसे, साताप्पा बागडी, सर्जेराव बागडी, लक्ष्मीबाई धातुंडे, उदय धातुंडे, रत्नाकर विटेकरी, विष्णू हतळगे उपस्थित होते.

आम्ही गोंधळी-गोंधळी
आम्ही गोंधळी-गोंधळी, गोविंद गोपाळांच्या मेळी..
आमचा घालावा गोंधळ, वाजवूं हरिनामीं संभळ.... असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळी बांधवांनी शासनाकडे आपल्या मागण्यांचा गोंधळ घातला.

वासुदेवही दिसले...
पूर्वी पहाटे-पहाटे गावागावांत दिसणारे वासुदेव पारंपरिक वेशभूषेत शहरातील रस्त्यावरून जाताना दिसले. त्यामुळे खूप दिवसांनी वासुदेव बघितल्याची भावना शहरवासीयांनीही बोलून दाखवली.

Web Title: marathi news kolhapur agitation for additional reservation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com