जळगावात फुलले भाजपचे कमळ; शिवसेनेला मानावे लागले 14 जागांवर समाधान तर काँग्रेसचे खातेही उघडले नाही  

जळगावात फुलले भाजपचे कमळ; शिवसेनेला मानावे लागले 14 जागांवर समाधान तर काँग्रेसचे खातेही उघडले नाही  

जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ प्रभागांमधील ७५ जागांपैकी ५७ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेला फक्त १४ जागा जिंकून समाधान मानावे लागले आहे. दोन्ही काॅंग्रेसला खातेही उघडता आले नाही. भाजपने प्रथमच पालिकेत सत्ता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यभरातील राजकीय धुरीणांचे या निवडणुकीवर लक्ष लागून होते. 

भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली. शिवसेनेचे नेतृत्व माजी मंत्री सुरेश जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शुक्रवारी (ता. ३) शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील सेक्‍टर आठमध्ये सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला टपाली मतदानासंबंधी मतमोजणीची कार्यवाही झाली. 

मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेना नेते सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खानदेश विकास आघाडीची मनसेच्या पाठबळाने सत्ता स्थापन झाली होती. खानदेश विकास आघाडीचे ३२ नगरसेवक होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर जैन गटाने निवडणूक लढली.
मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व आठ जागा गमावल्या आहेत. कॉंग्रेस या वेळेसही खाते उघडू शकली नाही. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने प्रथमच तीन जागा पालिकेत जिंकल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

माजी महापौर नितीन लढ्ढा, भारती सोनवणे, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, लता सोनवणे हे दिग्गज विजयी झाले आहेत. नगरसेवक संदेश भोईटे यांची पत्नी स्नेहा भोईटे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे बंधू श्‍यामकांत सोनवणे हे पराभूत झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com