माहीत आहे का पेन्शनचे प्रकार किती असतात...

माहीत आहे का पेन्शनचे प्रकार किती असतात...

कुठलाही शासकीय कर्मचारी निवृत्त होतो, तेव्हा त्याला निवृत्तीवेतन दिले जातेत. ते त्याच्या मृत्यूपर्यंत सुरू राहते. मृत्यूपश्चात या निवृत्तीवेतनाचा काही हिस्सा त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीलाही मिळतो. काही प्रसंगात, या कर्मचाऱ्याच्या अपत्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचीही तरतूद शासनात आहे. पण या निवृत्ती वेतनाचेही अनेक प्रकार असतात, हे आपल्याला माहीत नसते.   

एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत.

नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत.

अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.

निवृत्ती वेतन कोणाला देय आहे?

सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी सेवा उपदान दिले जाते. सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीसाठी अर्ध्या महिन्याचे वेतन असे उपदानाचे स्वरूप असते.

निवृत्तीवेतनाची परिगणना कशी केली जाते?

निवृत्ती वेतनाची परिगणना ही निवृत्तीपुर्वी शेवटच्या 10 महिन्यात घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे, त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या मूळ वेतनाच्या 50% दराने यापैकी जे फायदेशीर असेल ते निवृत्ती वेतन देय असते.

कुटूंब निवृत्तीवेतन म्हणजे काय व ते कोणाला मिळते?

कुटूंब निवृत्तीवेतन हे दोन प्रकारे मिळते. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर. कुटूंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस देण्यात येते.

परंतु, कर्मचाऱ्याची पत्नी/ पती हयात नसल्यास हे वेतन त्याच्या वारसदाराला देण्यात येते. मुलाला 21 वर्ष व मुलीला 24 वर्ष वय होईपर्यंत हे वेतन देता येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे अपत्य 100% विकलांग असल्यास त्याला कुटुंब निवृत्तीवेतन तहहयात मिळू शकते.

सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास... 

जर एक वर्ष सलग सेवा झाल्यानंतर सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटूंब निवृत्ती वेतन देय होते. एक वर्ष सलग सेवा होण्यापुर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणुक होण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल, तर त्यांच्या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन देण्यात येते.

Web Title: marathi news Do you know what the types of pensions are ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com