'क्रास'मुळे पतसंस्थांचा गैरफायदा घेणाऱ्या कर्जदारांवर राहणार वचक

'क्रास'मुळे पतसंस्थांचा गैरफायदा घेणाऱ्या कर्जदारांवर राहणार वचक

पुणे - काही थकीत कर्जदार एकापेक्षा जास्त सहकारी पतसंस्थांमधून कर्ज घेतात. तसेच, एकच मालमत्ता विविध संस्थांमध्ये तारण ठेवतात. यासारखे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी पतसंस्थांनी आता संगणक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदाराच्या पतमूल्यांकनासाठी बॅंकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सिबिल’च्या धर्तीवर ‘क्रेडिट रिपोर्ट अँड ॲनलिसिस सिस्टीम’ (CRAS)  ही प्रणाली आता पतसंस्थांमध्ये कार्यान्वित केली जात आहे.

थकीत कर्जदारांची ओळख पटविण्यासाठी सहकारी पतसंस्थांनी संगणक प्रणालीचा वापर करावा, असे निर्देश सहकार आयुक्‍त सतीश सोनी यांनी दिले आहेत. काही पतसंस्थांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘क्रास’ संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. आयुक्‍तांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने राज्यातील सुमारे १४ हजार पतसंस्थांमध्ये ही प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या प्रणालीद्वारे कर्जदाराचे पतमूल्यांकन केले जाते. चांगले गुणांकन असल्यास त्या सभासदाला कर्जपुरवठा करण्यात येतो. यामुळे चुकीच्या कर्जदाराला कर्जपुरवठा करून पतसंस्था अडचणीत येणार नाहीत, तसेच पतसंस्थांचा गैरफायदा घेणाऱ्या कर्जदार सभासदांवरही वचक राहणार आहे.

१३ हजार ३७९ - राज्यातील एकूण पतसंस्था
४२, ७१,५५८ - एकूण कर्जदार
४३, ७७५ कोटी - कर्जाची रक्‍कम
 ७,२०१ कोटी - थकबाकी रक्‍कम
सुमारे ७०० - पुणे शहरातील पतसंस्था

केवळ पतसंस्थाच नव्हे, तर देशातील कोणत्याही खासगी, राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंका, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून ग्राहकाने घेतलेल्या कर्जाची माहिती या संगणक ‘क्रास’ या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्जवाटप सोपे, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
- काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

Web Title: Cras Process Credit Society

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com