विदर्भात पुन्हा भाजपचाच डंका ?

विदर्भात पुन्हा भाजपचाच डंका ?

नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज (गुरुवारी) होत असून, भाजप-शिवसेनेने आपला हा विदर्भातील गड कायम राखताना दिसत आहे. भाजप 5 आणि शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांत 11 एप्रिल रोजी तर अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूर, चंद्रपूर व अकोला मतदारसंघांतील निकालाकडे साऱ्या राज्याचे व देशाचेही लक्ष लागले आहे. 

नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांनी तर, चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी आव्हान दिले आहे. तसेच संपूर्ण राज्यात तिसरी शक्ती म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे व कॉंग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांना तिहेरी लढतीत आव्हान देत आहे. 
बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव व राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात सामना रंगेल, तर यवतमाळ-वाशीममध्ये विद्यमान खासदार शिवसेनेच्या भावना गवळी यांना कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी लढत द्यावी लागेल. अमरावती मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे आनंदराव अडसूळ व नवनीत राणा यांच्यात लढत होईल. 

वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस व कॉंग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात, तर गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत होईल. अशीच थेट लढत रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने व कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांच्यातही रंगणार आहे. भंडारा मतदारसंघात भाजपने नव्या दमाच्या सुनील मेंढे यांच्याशी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांची लढत आहे.

Web Title: BJP alliance leading in Vidarbha for Lok Sabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com