यंदाही पहावी लागणार वरुणराजाची वाट.....

यंदाही पहावी लागणार वरुणराजाची वाट.....

दरवर्षी पर्जन्यमान कमीकमी होत चाललेय. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती यंदा खूपच भीषण आहे. उत्तर महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पावसाचे आगमन यंदाही लांबलेय. शेतकरी आधीच चिंतेत, त्यात आता पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरणीचे वेळापत्रक लांबणीवर पडणार आहे. ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळून निघतोय; तर शहरी भागात उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही स्थिती भयावह आहे. मनमाडला महिनाभराने पाणी मिळते. धुळे जिल्ह्यातला शिंदखेडा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. धुळे शहरात पाचव्या-सहाव्या दिवशी पाणी येते. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव, चोपडा, बोदवडमधील पिण्याच्या पाण्याची स्थिती वाईट आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल या केळीच्या पट्ट्यात पाण्याची पातळी हजार फुटांपेक्षाही खाली गेली आहे. पाण्यासाठी कूपनलिका खोदून जमिनीला चाळण बनवले जात आहे. कूपनलिकेचे पाणी संपले, तर जमिनीत आडवे "बोअरिंग' केले जातात. म्हणजे थोडक्‍यात जमिनीची शुष्क बनवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. 

जीवनदायिनी नद्याही प्रदूषित 
गेले चार-पाच दिवस पावसाची स्थिती निर्माण होते; पण पाऊस पडत नाही. पावसाला पूरक स्थिती, पर्यावरणाला पूरक वातावरणनिर्मितीसाठी काही प्रयत्न होतात काय, असा विचार केला असता त्याचे उत्तर नकारात्मक आहेत. निसर्गाला ओरबडण्याचे काम वेगाने सुरू आहेच, शिवाय निसर्ग वाचविण्याचे प्रयत्नही होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खानदेशातील आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था बिकट बनलेली आहे. गिरणा नदीचे पाणी अगदी बारा-पंधरा वर्षांपर्यंत जळगावला पुरायचे, आता ते जळगावला पोचतही नाही.

जळगावचा पाणीपुरवठा आता वाघूरमधून होतो. वाघूर नदी म्हणजे प्रदूषणाचे आगार. उगमापासून ते वाघूर धरणापर्यंत सगळ्या गावातले सांडपाण्याचे नाले वाघूर नदीला येऊन मिळतात. तापीची परिस्थिती वाघूरहून वेगळी नाही. तापी नदीत परिसरातल्या गावांतील आणि शहरांचे सांडपाणी येऊन मिळते. हतनूर धरणानेही यंदा तळ गाठला आहे. या भयावह स्थितीची चर्चा पाऊस येईपर्यंत भरपूर होते. चर्चेचे फड रंगतात; पण एकदा का थोडाफार पाऊस पडला, की ही चर्चा थांबते. जे काही पर्यावरण संरक्षणाचे थोडेफार प्रयत्न, जनजागृती सुरू असते, तीही थांबते.

थोडक्‍यात, तहान लागली की विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे. पर्यावरण संरक्षण, झाडांचे संगोपन, पाण्याची बचत, जलसंधारणाचे छोटे-छोटे प्रयत्न ही सवय का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. आपापला वाटा आपण उचलूया, ही वृत्ती का निर्माण होत नाही? भविष्याची फिकीर न करता निसर्गाला ओरबडण्यासाठी सर्व स्तरांवर स्वार्थी मनोवृत्ती सध्या वेगाने फोफावत आहे, ही जास्त चिंतेची बाब आहे.

Web Title: Article about the arrival of Rain written by Rahul Ranalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com