श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरेंचा शिवसेनेला दे धक्का

श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरेंचा शिवसेनेला  दे धक्का

अलिबाग : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी केला. मतदारांपर्यंत पोहचून मतपरिवर्तन करण्यासाठी अपार मेहनत घेतली; मात्र त्यांची ही मेहनत पूर्णतः फोल ठरली.

या निवडणुकीत अदिती तटकरे यांना 92 हजार 74 मते मिळाली; तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना 52 हजार 453 मतांवर समाधान मानावे लागले. श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे शिवसेनेवर अपयशामागची नेमकी कारणे शोधण्याची वेळ आली आहे.

श्रीवर्धन मतदारसंघात 1952, 1962, 1967, 1972, 1980, 1990 या कालावधीत कॉंग्रेसचे मा. ना. दिघे, ए. आर. अंतुले, रवींद्र राऊत आमदार म्हणून निवडून आले आहेत. या कालावधीत कॉंग्रेसचे वर्चस्व मतदारसंघात होते.

1990 नंतर शिवसेनेचा भगवा श्‍याम सावंत यांच्या रूपाने या मतदारसंघात फडकला. शिवसेनेला 1995 पासून ते 2004 पर्यंत या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्यात यश आले. 2009 नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांना पराभूत करून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अवधूत तटकरे आणि आता 2019 मध्ये अदिती तटकरे यांच्या रूपाने श्रीवर्धन मतदारसंघाला वारसदार मिळाला.

श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा तालुक्‍यासह तळा तालुक्‍याचा काही भाग यांचा समावेश होता. 2008 मध्ये मतदारसंघाच्या भौगोलिक रचनेनुसार फेररचना झाली. त्यामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव व रोहा तालुक्‍याचा काही भाग या मतदारसंघात सामील झाला. 2009 मध्ये अवधूत तटकरे काही फरकाने निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यासाठी सुनील तटकरे यांनी मेहनत घेतली.

राज्यात शिवसेना-भाजपचे प्राबल्य असल्याने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातही शिवसेनेची सत्ता येईल, अशी अपेक्षा शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना होती; परंतु राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जागते रहो या भूमिकेतून काम करून या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात अधिक लक्ष देऊन काम करण्यास सुरुवात केली.

मतदारसंघातील गावे, वाड्या वस्त्यांना भेटी देऊन राष्ट्रवादीचे प्राबल्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योग सुभाष देसाई यासारखी मोठमोठी राजकीय मंडळी विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात दाखल झाली होती.

सुनील तटकरे यांनीदेखील आपल्या मुलीला म्हणजे अदिती तटकरे यांना जिंकून देण्याचा चंग बांधला होता.
अदिती तटकरे यांनी 39 हजार 621 मतांनी विजयी होऊन विनोद घोसाळकरांचा पराभव केला. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या मतदारसंघात भविष्यात खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे विकासकामांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाया अजून मजबूत करतील, असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.

तरीही मतदार खेचण्यात अपयश!
श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. या मतदारांना आपल्याकडे वळते करण्यासाठी शिवसेनेने अनुभवी उमेदवार विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान तयार केले होते.

विनोद घोसाळकर यांनी माणगाव मतदारसंघातून सुनील तटकरे यांच्याविरोधात दोन वेळा आमदारकी लढविली आहे; मात्र या दोन्ही वेळेला दारुण पराभव झाला होता. या वेळेस सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांच्याविरोधात विनोद घोसाळकर यांना जनादेश निर्माण करायचा होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com