पुण्यात पावसाचा हाहाकार,जनजीवन विस्कळीत 

 पुण्यात पावसाचा हाहाकार,जनजीवन विस्कळीत 

पुणे-  मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुण्यात अक्षरशः हाहाकार उडाला. अवघ्या एका तासात पुण्याची वाताहत झाली. शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या ओढ्यांना पूर आले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शहरात ४३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.  

आंबिल ओढ्याच्या दोन ठिकाणी भिंती ढासळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ओढ्याच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वेगाने शिरले. परिणामी सहकारनगर आणि अरण्येश्‍वर परिसरातील बहुतांश सर्व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे भर पावसात नागरिकांना बचावासाठी रात्रभर इमारतीच्या छतावर आसरा घ्यावा लागला. पावसामुळे पुराच्या पाण्याची वेगाने वाढणारी पातळी, त्याच वेळी कात्रजच्या तलावातून ओसंडून वाहणारे पाणी यामुळे सातारा रस्त्याच्या दुतर्फा वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला. त्यातच कात्रज तलाव ओसंडून वाहू लागल्याने पाण्याच्या लोंढ्यात दोन जण वाहून गेल्याची भीती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ व्यक्त केली.

कात्रज तलावातून पाणी मोठ्या प्रमाणात आंबिल ओढ्याकडे आल्याने सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मागील बाजूस या ओढ्याची भिंत ढासळली. ही घटना रात्री दहाच्या दरम्यान घडली. त्याच वेळी कोल्हेवाडी लेन नंबर एकच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याची भिंतही पाण्याच्या प्रचंड वेगाने पडली. त्यामुळे बाजूच्या वस्तीत पाण्याचे लोट शिरले. पहिल्या मजल्यापर्यंत हे पाणी शिरल्याने त्यातील रहिवाशांना वरच्या मजल्यावर आणि छतावर आसरा घ्यावा लागला.

मदतीसाठी नागरिकांचे फोन 
बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. रात्री दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर प्रचंड वाढला. त्यामुळे शहराच्या मध्य वस्तीतून वाहणाऱ्या आंबिल ओढा, माणिकनाला, भैरोबानाला, नगझरीनाला या नाल्यांना पूर आले. त्याचे पाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये घुसले. रात्री अकरा वाजल्यानंतर अक्षरशः मदतीसाठी महापालिका, पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन यंत्रणा आणि ‘सकाळ’च्या कार्यालयाचे दूरध्वनी खणखणत होते.  ठिकठिकाणी पुरात अडकलेले नागरिक मदतीसाठी संपर्क साधत होते. 

Web Title: heavy rain pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com