पाच प्रकल्पांना ६१४४ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता

पाच प्रकल्पांना ६१४४ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई - आचारसंहितेचा कालावधी जवळ येत असतानाच आज राज्यातील पाच सिंचन प्रकल्पांवर तब्बल ६१४४ कोटी रुपयांच्या अतिरिक्‍त रकमेचे ‘शिंपण’ करण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदामंत्र्यांच्या एकट्या जळगाव जिल्ह्यातील चार प्रकल्पांना ४०५३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ३७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, जवळजवळ सर्व विभागांच्या महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने आज या पाच प्रकल्पांच्या सुधारित खर्चाच्या तरतुदीला मान्यता दिली. जलसंपदा विभागाची एका वर्षाची तरतूद सुमारे आठ ते दहा हजार कोटींच्या दरम्यान असताना, पाच प्रकल्पांना ६१४४ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पास २ हजार २८८ कोटी, हतनूर प्रकल्पाला ५३६ कोटी, वरणगाव प्रकल्पाला ८६१ कोटी, तर शेळगाव बॅरेजला ९६८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय भातसा सिंचन प्रकल्पाला १४९१ कोटी रुपयांच्या अतिरिक्‍त खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 

वाघूर प्रकल्पाची ही सातवी सुधारित प्रशासकीय मान्यता असून, या प्रकल्पामुळे जळगाव, भुसावळ, जामनेर तालुक्‍यांतील ३६ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

हतनूर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यातील १२४ गावातील ३७ हजार ८३८ हेक्‍टर क्षेत्राला लाभ होणार आहे.

वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजनेस पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. या प्रकल्पांतर्गत हतनूर प्रकल्पाच्या जलाशयातून १२४.४१९ दलघमी पाणी उपसा करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात उपसाद्वारे १४.४९ दलघमी पाण्याने ३६९० हेक्‍टर सिंचनक्षेत्र बंदिस्त पाइपलाइनद्वारे सिंचित करणे व उर्वरित १०९.९२९ दलघमी दुसऱ्या टप्प्यात उपसा करून ते हतनूर धरणापासून ९ किमी अंतरावरील एका नाल्यावर ओझरखेडा धरणामध्ये सोडण्याचे प्रस्तावित आहे.

याद्वारे बंदिस्त पाइपलाइनद्वारे १३,२५८ हेक्‍टर सिंचन क्षेत्र निर्माण करणे, असे एकूण १६ हजार ९४८ हेक्‍टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये जिल्ह्यातील भुसावळ तालुक्‍यातील ११ हजार ६०६ हेक्‍टर, बोदवड तालुक्‍यातील ३९८४ हेक्‍टर आणि मुक्ताईनगर तालुक्‍यातील १३५८ हेक्‍टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील भातसा प्रकल्पास २०१७-१८ च्या दरसूचीनुसार १ हजार ४९१ कोटींची सहावी सुधारित प्रशासकीय मान्यता आज देण्यात आली.

भातसा प्रकल्पांतर्गत भातसा नदीवर धरण बांधणे, मुमरी नदीवर शहापूर तालुक्‍यातील सारंगपुरी येथे मुमरी धरण बांधणे, भातसा उजवा व डावा कालवा बांधणे आणि १५ मेगावॉट वीज निर्मितीसाठी विद्युतगृह बांधणे प्रस्तावित आहे.

शेळगाव बॅरेज प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पामुळे यावल तालुक्‍यातील १९ गावांतील ९ हजार १२८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा संकल्पीय पाणीसाठा ११६ दशलक्ष घनमीटर एवढा असणार आहे. या प्रकल्पाचे क्षेत्र हे डार्क झोनमध्ये मोडत असून, त्याचा समावेश बळिराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे.


Web Title: Fiver Irrigation Project Sanction

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com