जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडल्या जाणार नाहीत - मुख्यमंत्री  

जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडल्या जाणार नाहीत - मुख्यमंत्री  

मजुरांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असल्याने आता खर्‍या अर्थाने सावध राहून संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. कंटेन्मेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील याची खबरदारी घेताना कोरोनाचा विषाणू या झोनबाहेर जाणार नाही याची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांची आहे. मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, त्यातच येणार्‍या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्या साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाळ्यात साथीच्या व इतर रोगांचा मुकाबला कोरोनाशी लढताना करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील खासगी डॉक्टर्सच्या नियमितरीत्या सेवा सुरू होतील. याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे आरोग्य आणीबाणी आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी ही तारेवरची कसरत असल्याने उद्योग व्यवसायही सुरू करावे लागत असले, तरी तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू केली आहे. पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा  17 मेनंतर सुरू होणार असून तो कसा असेल याचा आराखडा काळजीपूर्वक तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना दिले. परप्रांतीय मजुरांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागणार असून आरोग्य विभागातील रिक्त जागाही भराव्या लागतील. जिल्हाधिकार्‍यांनी केवळ कोरोना नव्हे, तर इतर आजारांचीही प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सुरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

WebTittle :: District boundaries will not be opened at all - CM

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com