कंपन्यांची शेअर बाजारात जोरदार उसळण 

कंपन्यांची शेअर बाजारात जोरदार उसळण 

पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या आधारावर शेअर बाजाराने जोरदार उसळण घेत गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात ६.८२ लाख रुपये कमाविले.

वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गोव्यात आल्या होत्या. जागतिक मंदीच्या काळात गुंतवणुकीला चालना देण्याच्या हेतूने सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर कपातीमुळे केंद्र सरकारला एक लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, असे स्पष्ट करतानाच त्यांनी या कर कपातीमुळे किती गुंतवणूक वाढेल याविषयी अंदाज व्यक्त करण्यासही नकार दिला. सरकारची यंदाची वित्तीय तूट वाढेल की घटेल यावरही भाष्य करणे त्यांनी टाळले. सीतारामन यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, कोणतीही कर सवलत न घेणाऱ्या उद्योगांना २५.१७ टक्के कर द्यावा लागेल. यात अधिभार व उपकरांचा समावेश आहे. त्यांना पर्यायी किमान करही द्यावा लागणार नाही. नवीन गुंतवणूक यावी व रोजगार निर्मिती व्हावी यासाठी १ ऑक्‍टोबर २०१९ नंतर नोंद होणाऱ्या पण ३१ मार्च २०२३ पूर्वी उत्पादन सुरू करू शकणाऱ्या कंपन्यांनी इतर कोणतीही कर सवलत न घेतल्यास त्यांना १७.०१ टक्के कर भरावा लागेल. सध्या हा कर ३० टक्के दराने आकारला जातो. 

सध्या कर सवलत घेणाऱ्या उद्योगांना या नव्या कर दराच्या योजनेत यायचे असल्यास त्यांना कर सवलतीचा कालावधी संपल्यानंतर याचा लाभ घेता येईल. मात्र एकदा नव्या कर योजनेत समाविष्ट झाल्यावर परत जून्या कर दरांच्या योजनेकडे वळता येणार नाही.संशोधन व विकासासाठी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून दोन टक्के रक्कम देण्याची मुभा असेल असे जाहीर केले. विदेशी गुंतवणुक असलेल्या पण भारतीय भागीदारी असलेल्या कंपन्यांनाही हे करविषयक नवे दर लागू होतील. एक एप्रिल २०१९ या पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे दर लागू होणार असून यापूर्वी जून्या दराने केलेला कर भरणा, नवीन कर भरणा करतेवेळी त्यातील फरक वजा केला जाणार आहे. 

भांडवली बाजारात पैसा खेळता राहावा यासाठीही काही उपाययोजनांची घोषणा सीतारामन यांनी आज केली.त्यानुसार समभाग विक्रीतून येणाऱ्या भांडवली उत्पन्नावर सुरक्षा व्यवहार कर (सेक्‍युरिटी ट्रान्सझॅक्‍शन टॅक्‍स) लागू होणार असेल तर त्याला अधिभार आकारला जाणार नाही. व्यक्की, हिंदू अविभक्त कुटुंब आदींच्या व्यवहारांसाठीच ही सवलत असेल. ज्या कंपन्यांनी ५ जुलै २०१९ पूर्वी आपले समभाग परत घेण्याची घोषणा केली आहे त्यांना त्यासाठी कर भरणा करावा लागणार नाही.

शेअर बाजाराची झेप..!

मुंबई - सरकारकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवार तेजीचे वारे संचारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल १ हजार ९२१ अंशांची झेप घेऊन ३८ हजार १४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५६९ अंशांची उसळी घेऊन ११ हजार २७४ अंशांवर बंद झाला. आज दिवसभरात सेन्सेक्‍स २ हजार २८४ अंशांनी वधारून ३८ हजार ३७८ अंशांच्या पातळीवर गेला होता. सेन्सेक्‍स आणि निफ्टीने आज दशकभरात एकाच दिवसात झालेली सर्वाधिक वाढ नोंदविली.

हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’ला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. त्यामुळे देशातील १३० कोटी जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


Web Title: Company tax rate decrease investment nirmala sitharaman

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com