‘पी ३०५ बार्ज’ च्या दुर्घटनेस बार्जचा कॅप्टनच जबाबदार

P 305 Barge
P 305 Barge

दुर्घटनेतून सुखरुप गोव्यात परतलेल्या फायरमॅन आनंदचा गंभीर आरोप

पणजी : तौक्ते चक्रीवादळाचा इशारा पी 305 बार्जचा  P305 barge कॅप्टन राकेश बल्लव व एफकॉन इन्चार्ज यांनी गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. याला सर्वस्वी कॅप्टन Captain बल्लव जबाबदार असल्याचा गंभीर आरोप या दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमॅन Fireman आनंद डिमट्टी (22 वर्षे, हळदोणे)  केला. (The captain of the barge was responsible for the P305 barge accident)

हे देखिल पहा - 

आनंद हा रविवारी (ता. 24) गोव्यात परतला आहे. मागील साडेपाच महिन्यांपासून तो बार्जवर फायरमॅन म्हणून कामाला होता. बार्ज बुडाल्यावर समुद्रात त्याने सलग १५ तास चक्रीवादळात अजस्र लाटांशी सामना करत साक्षात मृत्युशी झुंज दिली. त्याने सांगितलेला घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा होता. तो म्हणाला, 15 मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. मात्र बार्जच्या कॅप्टनने व एफकॉन इन्चार्ज यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळे 17 मे रोजी बार्जवरील 270 जणांचा जीव संकटात सापडला. आतापर्यंत दुर्घटनेतील ७० जणांचे मृतदेह मिळाले आहेत. माझे दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो, नाहीतर या मृतांच्या यादीत माझेही नाव आले असते.

सतरा रोजी सकाळी सातच्या सुमारास बार्जचे आॅटो ॲंकर तुटल्याने बार्ज भरकटली व ती सुमारे दहाच्या सुमारास ओएनजीसीच्या आॅईल प्लॅटफार्मला धडकली. संध्याकाळी पाचच्या सुमारास बार्ज ऐंशी टक्के बुडाल्याने आम्हाला नाईलाजाने समुद्रात उडी घ्यावी लागली. उडी मारल्यानंतर बार्जचे साहित्य हाता-पायाला, पाठीला लागून थोडी दुखापत झाली. सलग पंधरा तास अजस्र लाटांशी झुंज देत होतो. चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे बचाव मोहिमेस मर्यादा येत होत्या. तीन ते चारवेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले. अखेर नौदलाच्या बचाव पथकाने सातत्याने शर्थीचे प्रयत्न करून आमचा जीव वाचविला. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, आॅफशोअर एनर्जी यांनी बचाव मोहीम अखंडपणे सुरू ठेवली होती. बार्जवरील फायरब्रिगेड टीममध्ये आम्ही एकूण तेराजण होतो. त्यातील योगेश नावाच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातून मी एकटाच होतो. आॅफशोअर एनर्जी जहाजातून स्क्रंबल नेटच्या सहाय्याने मला व माझ्या काही सहकाऱ्यांना वर ओढण्यात आले. आम्हाला वाचवल्यानंतर सुमारे आठ ते -नऊ तास शोधमोहीम राबवण्यात आली. 19 तारखेला यलो गेट येथे आम्हाला आणण्यात आले. पोलिसांनी आमचा जबाब लिहून घेतला व नंतर आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 20  मे रोजी मला बसने गोव्याला पाठवण्यात आले.

आनंद म्हणाला, आम्ही सारेजण हेलिपॅडवर एकत्र आलो होतो. कॅप्टनने उडी मारण्याचे आदेश येताच समुद्र पातळीपासून सुमारे पन्नास मीटर उंचीवरील बार्जवरून आम्ही सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या. उड्या मारताना काहींजणांचे डोके हेलकावणाऱ्या बार्जला आपटले. त्यामुळे काहींचा त्यात मृत्यू झाला असावा. आपल्यालाही उजव्या पायाला, हाताला व पाठीला जखम होऊन दुखापत झाल्याचे आनंदने सांगितले.

दहा ते पंधरा जणांचा डोळ्यांदेखत मृत्यू 

माझ्या डोळ्यासमोरच उसळत्या लाटांवर पाण्यावर आपटणाऱ्या दहा ते पंधरा सहकाऱ्यांचा नाकातोंडात पाणी जावून घुसमटून मृत्यू झाल्याचे आनंदने सांगितले. उत्तर प्रदेशमधील अमित सिंग नावाचा माझा सहकारी माझ्याशेजारी तरंगत होता. सलग तेरा ते चौदा तास पाण्यात राहून तो दमला होता. अजस्र लाटांचा मारा त्याला सहन झाला नाही. त्यातच दुर्दैवाने त्याच्या लाईफ जॅकेटची क्लिप सुटून तो लाटेसह पाण्यावर आदळून पाण्याखाली गेला तो वर आलाच नाही. त्यामुळे मी रडकुंडीला आलो. माझ्या डोळ्यांदेखत माझे सहकारी बुडत होते. पण मी पाहण्याखेरीज काही करू शकलो नाही, अशी खंत आनंदने व्यक्त केली.

Edited By - Puja Bonkile
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com