नवापुरात बोट उलटल्याने 15 जण बुडाले

नवापुरात बोट उलटल्याने 15 जण बुडाले

नवापूर- नवापुरात बोट उलटल्यानं १५ जण बुडाल्याची घटना घडली आहे.महाराष्ट्र- गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या ‘बॅकवॉटर’मध्ये ही बोट उलटली आहे. यात १५ जण बुडाले. त्यात स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी सहा जणांचे प्राण वाचविले, एका चिमुकलीचा घटनास्थळी बुडून मृत्यू झाला, तर आठ  जण बेपत्ता आहेत. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.

होळीची सुटी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटिंग करण्यासाठी गेले होते. भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाल्याने दुर्घटना झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाचवा वाचवा आरडाओरड होत असल्याने नजीकच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना घटनेचे गांभीर्य कळले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या मारल्या. त्यांनी सहा जणांना पाण्यातून बाहेर काढून प्राण वाचविले. सुंदरपूर गाव नवापूर शहरापासून पाच किलोमीटरवर आहे. सुंदरपूर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. आज दुपारी चारच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील ‘बॅकवॉटर’जवळील भिंतखुद गावाजवळ ही घटना घडली. बचावकार्य सुरू झाले असून, अंधार पडल्याने बचावकार्याला अडचणी येत आहे. पोलिस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. 

घटनेत संपूर्ण कुटुंब बुडालं
एंजल्स कोकणी (वय १५), राकेश बळीराम कोकणी (वय ३२, रा सुंदरपूर ता.उच्छल जिल्हा तापी गुजरात) या दोन्ही पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. राकेश हे भारतीय स्टेट बँकेत शिपाई म्हणून नोकरी करीत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडाले. 

घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं 
विकास राजू गामित (वय २० रा वणझारी ता.उच्छ्ल ), सुमित पारध्या गामित (वय २२, रा. भींतखुद ता.उच्छ्ल), दिनेश देवाजी वळवी (वय २८, रा. वणझारी ता. उच्छ्ल), जिग्नेश नारू कोकणी (वय २०, सुंदरपूर ता.उच्छल), याकुब भीमसिग कोकणी (वय २८, रा.सुंदरपूर), संजना कोकणी (वय १४), अभिषेक कोकणी (वय १२), आराहण कोकणी (वय ०९), उर्मिला कोकणी (वय २२), विनोद बुध्या कोकणी (वय १८, सर्व रहणार सुंदरपूर). 

 

Web Title: 15 people drowned when the boat was turned over

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com